विज्ञान-रंजन – खोल खोल पाणी…

3 hours ago 1

>> विनायक

आपल्या पृथ्वीला ‘ब्ल्यू प्लॅनेट’ म्हणतात. कारण अवकाशातून काढलेल्या फोटोत आपला ग्रह निळा दिसतो. त्याचं कारण म्हणजे, पृथ्वीवर 7 महासागर आणि छोटे-मोठे असे 50 समुद्र असल्यामुळे! पृथ्वीचा जवळपास 75 टक्के भाग पाण्यानेच व्यापलेला आहे. या विशाल सागरांच्या मध्ये जेवढा भूभाग आहे त्यात सर्व देश सामावले आहेत. अर्थात 12800 किलोमीटर व्यास असलेल्या आपल्या ग्रहावर जागा प्रचंड आहे. जरी, केवळ माणसंच आठ अब्जांपर्यंत वाढली असली तरी नीट नियोजन त्यांना सुखकर जीवन देऊ शकतं… पण… जाऊ दे. तो आताचा विषय नाही. आपण पृथ्वीवरची सर्वात खोलवर पाणी असलेली जागा कोणती यासंबंधी माहिती घेऊया. त्याआधी जगभरच्या सर्व समुद्रांची यादी तपासूया.

यापैकी, पृथ्वीवरचे जे सात सर्वात मोठे जलसाठे आहेत ते महासागर, त्यापेक्षा लहान सागर किंवा समुद्र, त्यापेक्षा छोटे उपसागर, मग सामुद्रधुनी अशी साधारण विभागणी. पण ‘भूमध्य’ समुद्रासारखे काही जलसाठे वगळता बाकीचे सर्व महासागर, सागर, उपसागर वगैरे परस्परांना जोडलेलेच आहेत. त्यांची नावं आणि हद्द माणसाने त्याच्या सोयीसाठी ठरवलीय इतकंच.

यातील महासागरांची वर्गवारी आर्क्टिक, उत्तर अटलांटिक, दक्षिण अटलांटिक, हिंदी महासागर, उत्तर पॅसिफिक, दक्षिण पॅसिफिक आणि अण्टार्क्टिक महासागर अशी आहे. त्यानंतर येतात ते समुद्र. त्यातील महाराष्ट्राचा 700 किलोमीटरचा किनारा ज्या समुद्राचा आहे तो हिंदुस्थानचा पश्चिमेकडचा अरबी समुद्र. 3862 चौरस किलोमीटर एवढ्या विस्ताराचा आहे. परंतु तो महासागर नव्हे. हिंदुस्थानच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्याची मात्र महत्त्वाच्या सात महासागरांत गणना होते. त्याचं क्षेत्रफळ 7,05,60,000 चौरस किलोमीटर एवढं प्रचंड आहे. सात महासागरांच्या मालिकेत त्याचा क्रमांक तिसरा लागतो.

सर्व महासागर, समुद्र, उपसागर यांची मिळून सरासरी सागरी सखोलता 12,080 फूट आहे. काही छोटे समुद्र फार उथळ असून काही ठिकाणची खोली प्रचंड आहे. पृथ्वीवरच्या सर्व समुद्रांचा, महासागरांचा संपूर्ण जलसाठा 1,335,000,000 घन किलोमीटर किंवा गॅलनच्या मापाने 352,670,000,000,000,000 एवढा प्रचंड आहे. एक गॅलन म्हणजे साधारण पावणेचार लिटर या हिशेबाने गुणाकार करून बघा, ते मनोरंजक ठरेल.

या सर्व जलनिधींमध्ये पॅसिफिक किंवा प्रशांत महासागराचा मान मोठा. पृथ्वीच्या निर्मितीनंतर लाखो वर्षात बर्फमय धूमकेतू वगैरे आदळून जे पाणी साठलं त्यालाही कोट्यवधी वर्षं झाली. ‘पॅन्जिया’ काळात सर्व भूखंड (कॉनिनन्ट) एकत्र होते तेव्हा उरलेला महासागर सर्वव्यापी होता. पुढे ज्याला गोंडवनालॅण्ड म्हटलं जातं त्या महाखंडाची विभागणी होऊन सात खंड अवतरले. त्यातच आपला उपखंड, आशियाई खंडाला टक्करून हिमालय निर्माण झाला. त्याविषयी पुढच्या लेखात.

पृथ्वीवर सप्तखंड निर्माण झाल्याने पाण्याचीही विभागणी झाली आणि त्यातून विविध समुद्र तयार झाले. थोडक्यात, जलसाठेही विभागले गेले आणि फर्निनान्ड मॅजेलेन या पोर्तुगीजाने एका महासागराला ‘पॅसिफिक’ म्हणजे प्रशांत असं नाव दिलं, बाकी बरीचशी नावं शेजारच्या भूप्रदेशावरून पडलेली आहेत. पृथ्वीवरच्या एकूण जलसाठ्यापैकी 46 टक्के पाणी एकटय़ा पॅसिफिक महासागरात असून त्याने पृथ्वीचा 32 टक्के भाग व्यापलेला आहे. जपान ते अमेरिका अशी त्याची प्रचंड व्याप्ती आहे.

दोन समुद्र जोडून वाहतुकीचा महत्त्वाचा यशस्वी प्रयोग म्हणजे लाल समुद्र आणि भूमध्य समुद्र यांच्यामधली दगड-माती उकरून एकोणिसाव्या शतकात तयार झालेला सुवेझ कालवा. त्यामुळे पर्यटक आणि व्यापाऱ्यांचा दक्षिण आफ्रिकेच्या ‘केप ऑफ गुड होप’ या टोकाला घालावा लागणारा वळसा वाचला. त्याचप्रमाणे विसाव्या शतकात खणल्या गेलेल्या ‘पनामा’ या वैशिष्टय़पूर्ण कालव्याने अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरातील जहाजांना दक्षिण अमेरिकेच्या टोकाला वळसा घालण्याची गरज उरली नाही.

आता महासागराची सर्वाधिक खोल पाण्याची जागा, ती पॅसिफिक महासागरातच आहे. त्या जागेचं नाव ‘मरियाना ट्रेन्च’. हा ‘मरियाना’  नावाचा सागरतळाशी असलेला ‘खंदक’ चंद्रकोरीच्या आकाराचा असून त्याची रुंदी 69 किलोमीटर आणि लांबी 2550 किलोमीटर आहे. त्यातील सर्वाधिक खोल जागा आहे, समुद्रसपाटीपासून तब्बल सुमारे 11 हजार मीटरवर. किलोमीटरच्या भाषेत या मरियाना ट्रेन्चमधला सर्वात खोल ‘चॅलेन्जर’ खड्डा सागरसपाटीपासून सुमारे दोन किलोमीटर खोलवर गेल्यावरच दिसतो. तिथला पाण्याचा दाब 1000 पट जास्त असून, पाणीसुद्धा सागरी पृष्ठभागापेक्षा 5 पट दाट आहे. तिथलं तापमान 1 ते 4 अंश सेल्सिअस एवढं असतं.

या खोलीपर्यंत जलस्तंभाचं वजन पेलत जाण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न डॉन वॉल्श आणि जॅकस पिपॅर्ड यांनी 1960 मध्ये केला. त्यानंतर 2012 मध्ये जेम्स कॅमेरॉन यानी एकटय़ाने तिथे जायचं साहस दाखवलं. विक्टर वेस्कोवो यांनी ‘चॅलेंजर डीप’मध्ये 15 वेळा ‘बुडी’ मारली. पॅथरिन स्युलिवॅन आणि वेनेसा ओग्रिन या दोन महिलांनीही पॅसिफिक महासागरातली ही खोलवरची जागा ‘पाहून’ येण्याचं धाडस 2020 मध्ये केलं. हे चॅलेंजर डीप, समुद्रसपाटीपासून 35,814 फूट खोल आहे. सागरी संशोधक आणि साहसवीरांना ते कायमचं ‘चॅलेंज’ आहेच.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article