कोल्हापूर : कोल्हापूर ही महान शासक राजर्षी शाहू महाराज यांची भूमी आहे. येथे शेती, उद्योग, आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये विकास करण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, स्वयंशिस्त, कष्ट, प्रामाणिकपणा व कामावरील निष्ठा या चतुःसूत्रीचा अवलंब करत जीवनात यशस्वी व्हा, असा कानमंत्र कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी दिला.
शिवाजी विद्यापीठाच्या 61 व्या दीक्षान्त समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विद्यापीठातील राजमाता जिजाऊ सभागृहात झालेल्या समारंभास पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी जैव रसायनशास्त्र अधिविभागातील बंडू राजू कोळी यांना ‘राष्ट्रपती सुवर्णपदक,’ तर मानसशास्त्र अधिविभागातील विद्यार्थिनी क्रिशा अल्दा नोरोन्हा यांना ‘कुलपती पदक’ राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
‘एनईपी’अंतर्गत 2036 पर्यंत विद्यार्थी नोंदणी प्रमाण 50 टक्के साध्य करणार : राज्यपाल
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, शिवाजी विद्यापीठाला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि विद्यापीठ परिसरात स्थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा त्यांच्या शौर्याची आठवण करून देतो. मी सहा वर्षांचा असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल शिकलो. त्यांनी वेल्लोर, तंजावर, जिंजी (सेनजी) आणि तामिळनाडूतील इतर काही ठिकाणी भेट दिली होती हे ऐकून अभिमान वाटतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत (एनईपी) 2036 पर्यंत उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी नोंदणी प्रमाण 50 टक्के साध्य करण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी शैक्षणिक संस्थांनी गुणवत्ता व उत्कृष्टता राखून संख्यात्मक विस्ताराची आवश्यकता आहे. शिवाजी विद्यापीठ उत्कृष्टतेचा वारसा कायम ठेवेल व समाजाच्या प्रगतीत योगदान देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आधुनिक भारताच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण दुवा : चंद्रकांत पाटील
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आधुनिक भारताच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण दुवा ठरणार आहे. शैक्षणिक धोरणाविषयी जनजागृती, शासनाची भूमिका सुस्पष्ट करणे, सर्व सामाजिक-शैक्षणिक घटकांना सहभागी करून घेण्यासाठी शासन जोमाने काम करीत आहे. यासाठी शासनाने ‘प्रश्न तुमचे, उत्तर आमचे’ हा ऑनलाईन अभिनव उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य यांच्यासह नागरिक शिक्षणतज्ज्ञांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने त्यांचे शंका- समाधान करू शकतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने खुली व पारदर्शी व्यवस्था निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने उपस्थित होणार्या विविध शंकांचे समाधान करून एकप्रकारे शिवाजी विद्यापीठ इतरांना दिशादर्शन करीत आहे. राज्य शासनाने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील ग्रॉस एनरॉलमेंट रेशो वाढवून पुढील दहा वर्षांत तो 50 टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणार्या कुटुंबांतील विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा विद्यार्थिनींना लाभ होत असून, उच्च शिक्षणातील मुलींचा टक्का वाढला आहे.
मंत्री पाटील म्हणाले, भारत आज स्टार्टअप इकॉनॉमीमध्ये तिसर्या क्रमांकावर आहे. त्यातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. भारतात एक लाखाहून अधिक स्टार्टअप्स असून, शंभराहून अधिक युनिकॉर्न्स आहेत. भावी पिढी केवळ रोजगार शोधणारी न राहता, रोजगार निर्माण करणारी ठरणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था गेल्या 10 वर्षांत दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचली आहे. सर्वांचे परिश्रम व प्रयत्नाने जपान व जर्मनीला मागे टाकून तिसर्या स्थानावर पोहोचेल. ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन विकसित भारत 2047 ध्येयाकडे गतीने वाटचाल करत आहे. आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर आणि नवकल्पनांचे महत्त्व वाढले आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वप्नांची दिशा दिली आहे. विद्यार्थ्यांनी नेहमीच नवे विचार आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारून प्रगतीची शिखरे गाठावीत, असे आवाहन त्यांनी केले.
जागतिक समस्या सोडविण्यासाठी टीमवर्कची आवश्यकता : डॉ. आशिष लेले
डॉ. आशिष लेले म्हणाले, हवामान बदलापासून ते सामाजिक असमानता, संसाधनांचा र्हास ते जैवविविधतेचे नुकसान, जागतिक साथीच्या आजारांपासून ते दुर्गम आरोग्यसेवा अशा अभूतपूर्व आव्हानांना जग तोंड देत आहे. या समस्या गुंतागुंतीच्या आहेत. या समस्यांबद्दल विद्यार्थ्यांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. तुमच्यापैकी प्रत्येकात जीवनात आणि सभोवतालच्या जगात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. आजच्या जगाला भेडसावणार्या जटिल समस्या एक व्यक्ती सोडवू शकत नाही. त्यासाठी अनेक संस्था आणि अनेक विषयांमध्ये पसरलेल्या अत्यंत कार्यक्षम टीमवर्कची आवश्यकता आहे.
विद्यार्थ्यांनी उद्यमशीलतेला चालना द्यावी आणि नवीन बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्यांच्याकडे प्रचंड संसाधने उपलब्ध आहेत, त्यांच्या हातात खरी शक्ती नसून ज्यांच्याकडे बुद्धिमत्तेची शक्ती आहे आणि नवोपक्रमाची भावना आहे, त्यांच्या हातात ही शक्ती आहे. धैर्याने आणि द़ृढनिश्चयाने पुढे जा. तुमचे ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी योजना तयार करा. जर तुम्हाला मार्ग सापडत नसेल, तर एक नवीन मार्ग तयार करा. तुमच्यासाठी संधींचे दरवाजे सहज उघडत नसतील, तर स्वतःचे दरवाजे तयार करा. तुमच्या स्वप्नांचे जीवन जगण्यासाठी पुरेसे धाडसी व्हा. इतरांच्या अपेक्षांपेक्षा तुमचा द़ृष्टिकोन व उद्दिष्ट यांना तुमचे मार्गदर्शन करू द्या. हार मानू नका; कारण हार मानणारे कधीही विजेते नसतात. प्रचंड ऊर्मी असणारे लोकच अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. तुमच्या आकांक्षा खूप उंच ठेवा. कठोर परिश्रम करा, यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. यशासाठी उत्कृष्टतेचा सातत्याने पाठलाग करा, असे आवाहन त्यांनी केले.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. ते म्हणाले, नवीन जग वेगवान आणि स्पर्धेचे आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी विद्यार्थ्यांना पदवीबरोबरच काही महत्त्वाची जीवनकौशल्ये व तंत्रकौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत. जीवनावर अविचल निष्ठा ठेवून कार्यमग्न राहिल्यास यशस्वी होणे शक्य आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी पदवी, पदविकांची माहिती सादर केली. यावेळी खा. शाहू महाराज, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, भैयासाहेब माने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले.
38 पीएच.डी., तर 40 पारितोषिके विद्यार्थ्यांना प्रदान
दीक्षान्त समारंभात 38 स्नातकांना व्यासपीठावर पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर 40 पारितोषिके विद्यार्थ्यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यात विविध विषयांत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी, स्मृती पारितोषिके, पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळणारे व प्रथम क्रमांक संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्याशिवाय 14 हजार 269 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्र घेतले. 37 हजार 223 विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठवले जाणार आहे.