Published on
:
18 Jan 2025, 12:41 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:41 am
सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे, या मागणीसाठी शक्तिपीठ बाधीत शेती बचाव कृती समितीने आमदार सुधीर गाडगीळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. दि. 22 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत आले तर त्यांच्याशी चर्चा करून महामार्ग रद्द करण्याची विनंती करण्याचे आश्वासन यावेळी आमदार गाडगीळ यांनी शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्दची घोषणा न केल्यास दि. 24 जानेवारीला आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय कायम आहे, असे समितीचे प्रमुख उमेश देशमुख यांनी सांगितले.
ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा, या मागणीसाठी अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. आंदोलन करूनही महाराष्ट्र सरकार शेतकर्यांचा विचार करायला तयार नाही. रेखांकन बदलून महामार्ग करणार, अशा वल्गना हवेत विरल्या. ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे, तेथील शेतकर्यांना मोबदला कसा देणार, याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री काहीही बोलायला तयार नाहीत. म्हणून आज आमदारांना निवेदन दिले.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे संचालक यांनी पर्यावरण खात्याकडे शक्तिपीठ महामार्गाबाबत परवानगीसाठी अर्ज दाखल केला. सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन शक्तिपीठ महामार्गाच्या कामासाठी भूसंपादन सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या महामार्गाला विरोध करत आहेत, मात्र सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याबाबत बोलत नाहीत. म्हणून सत्ताधारी आमदारांच्या दारात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंबंधीचे निवेदन आमदार गाडगीळ यांना देण्यात आले. यावेळी प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारूगडे, सुधाकर पाटील, रमेश एडके, उत्तम पाटील, गजानन हारूगडे, रघुनाथ पाटील, विलास थोरात, प्रशांत पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.