औंध शिक्षण मंडळाच्यावतीने ना. अजित पवार यांचा स्नेह पत्र देऊन गौरव करताना गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हणमंत शिंदे, प्रदिप कणसे, संजय निकम व इतर.Pudhari Photo
Published on
:
18 Jan 2025, 12:30 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:30 am
औंध : औंध शिक्षण मंडळाच्या सर्व विद्या शाखांमधील पदाधिकारी वर्गाने उपलब्ध करुन दिलेल्या भौतिक सुविधांचे जतन करण्यासाठी तसेच शालेय गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुढील काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय उपक्रमाबरोबरच क्रीडा, कला, तंत्र, विज्ञान क्षेत्रात विद्यार्थी कसे चमकतील याकडे लक्ष द्या, अशा सूचना औंध शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
औंध शिक्षण मंडळाची पंचवार्षिक निवडणूक व वार्षिक सभा उत्साहात पार पडली. विश्वस्त मंडळ निवडीनंतर झालेल्या वार्षिक सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी औंध शिक्षण मंडळाच्या चेअरमनपदी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, व्हाईस चेअरमनपदी श्रीमंत चारूशीलाराजे पंतप्रतिनिधी, विश्वस्तपदी हणमंतराव शिंदे, प्रशांत खैरमोडे, अतुल क्षीरसागर, राजेंद्र माने, शाकिर आतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व उपस्थित सभासद, मान्यवरांनी अभिनंदन केले.
ना. अजित पवार यांनी यावेळी विद्या शाखांना भेडसावणार्या समस्या सोडवण्यासाठीही आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. चेअरमन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनीही विविध सूचना केल्या. सुरुवातीस सचिव प्रदिप कणसे यांनी मागील प्रोसिडींगचे वाचन केले व विविध विषयांवर चर्चा केली. अहवाल वाचन सहसचिव संजय निकम यांनी केले. संस्थेचा वार्षिक ताळेबंद सहसचिव दिपक कर्पे यांनी सादर केला. यावेळी आब्बास आतार, नंदकुमार शिंदे, सदाशिव पवार, अशोक महाडिक, डॉ. संजय यादव, शहाजी यादव, गणेश इंगळे, सभासद व सर्व विद्या शाखांचे प्रमुख उपस्थित होते.