Published on
:
24 Nov 2024, 1:07 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:07 am
हातकणंगले : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार राजू आवळे यांचा 46 हजार मतांनी पराभूत करीत अशोकराव माने यांनी एकतर्फी विजय संपादित केला. या विजयामध्ये शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना तसेच मतदार संघातील नेते मंडळींची एकजुटी पहावयास मिळाली. त्यामुळेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोकराव माने यांनी मोठ्या मताधिक्याने विजयाला गवसणी घातली. माने यांच्या विजयाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
अशोकराव माने, आ. राजू आवळे आणि माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात तिरंगी लढत होईल, अशी चर्चा असतानाच निकालादिवशी मात्र एकतर्फी विजय हा अशोकराव माने यांनी मिळवला. या विजयामध्ये शासनाने सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजना यामध्ये प्रामुख्याने लाडकी बहीण, शेतकर्यांना प्रोत्साहन अनुदान यासारख्या अनेक योजना सरकारने देऊ केल्याने मतदारसंघातील महिलांची प्रमुख पसंती अशोकराव माने यांना मिळाल्याचे पाहावयास मिळाले.
पहिल्या फेरीपासूनच अशोकराव माने यांनी आघाडी घेत अखेरपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. अनेक वर्षे काँग्रेसने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. या निवडणुकीमध्येही त्यांना संधी मिळणार अशी मतदारसंघामध्ये चर्चा होती. मात्र, त्यांचा कमी पडलेला जनसंपर्क, कामाचा दर्जा यामुळे मतदारांनी त्यांना डावलले. माजी आ. डॉ. मिणचेकर यांनी ऐनवेळी महाविकास आघाडीतून बंडखोरी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून उमेदवारी जाहीर करत निवडणुकीस सामोरे गेले. मात्र, राजू शेट्टींची नेहमीच असलेली दुटप्पी भूमिका यामुळे लोकसभेवेळी मतदारांनी त्यांना डावलले होते. त्यामुळे विधानसभेची ही निवडणूक पक्षाच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. त्या द़ृष्टिकोनातून मिणचेकरांनी प्रयत्नही केले. मात्र शेतकरी संघटनेची असलेली मते ही त्यांना मिळू न शकल्याने मतदारांनी पुन्हा एकदा संघटनेवर अविश्वास दाखवला.
हातकणंगले विधानसभेचा इतिहास पाहिला असता निवडणूक नेहमी जातीय समीकरणावर अवलंबून राहिल्याचे दिसत होते. मात्र, यंदा सर्वच पक्षांची जातीय समीकरणे चुकली असून विकासाला व शासनाच्या योजनांना प्राधान्य दिल्याचे मतदारसंघात पाहावयास मिळाले. या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर बौद्ध, मातंग समाजातील मतांची बेरीज करून पक्षाने आजवर उमेदवारी जाहीर केले होती; मात्र यंदा महायुतीने उमेदवार देते वेळेस पक्षाशी असलेल्या एकनिष्ठपणा व आ.विनय कोरे यांनी उमेदवारासाठी केलेला अट्टाहास यामुळे अशोकराव माने यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी देताना अनेक दिग्गज नेत्यांची नावे समोर आली. मात्र, कोरे यांनी उमेदवार अशोकराव माने हेच असतील, असे ठामपणे बजावल्यानंतर त्यांची उमेदवारी निश्चित झाली. यावेळी त्यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांनी त्यांना मान्य करत अशोकराव माने यांना भरघोस मतांनी विजयी केले. एकंदरीतच जातीय समीकरणाचा या निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला असल्याचे दिसत आहे.
महायुतीच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
हातकणंगले विधानसभेच्या निवडणुकीवेळी अशोकराव माने यांची उमेदवारी निश्चित झाल्यावर महायुतीमधील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. प्रामुख्याने खा. धैर्यशील माने, जनसुराज्य पक्षाचे आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, महाडिक गट, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आ. सुरेश हाळवणकर तसेच जि.प.चे माजी सदस्य अरुण इंगवले या नेत्यांची अशोकराव माने यांना मतांची आघाडी देण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली होती. सर्व नेतेमंडळी एकत्र येऊन अशोकराव माने यांचा प्रामाणिकपणे प्रचार करून त्यांना विजयश्री मिळवून दिली.