शिराळा : आ. सत्यजित देशमुख यांच्या विजयानंतर महिला व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.Pudhari File Photo
Published on
:
24 Nov 2024, 12:29 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:29 am
शिराळा : शिराळा मतदारसंघात परिवर्तन होऊन कमळ फुलले. येथे भाजप महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख 22 हजार 689 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचा पराभव केला. भाजपचे नेते सम्राट महाडिक हे देशमुख यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. वाळवा तालुक्यातील 48 गावांत भाजपला चांगली आघाडी मिळाली.
मतमोजणी सकाळी आठ वाजता गोरक्षनाथ आयटीआय येथे सुरू झाली. सुरुवातीपासून राजेंद्रसिंह नाईक, युवानेते विराज नाईक मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित होते. पहिल्या व दुसर्या फेरीत मानसिंगराव नाईक यांनी आघाडी घेतली होती, तर तिसर्या फेरीपासून अखेरपर्यंत सत्यजित देशमुख यांनी आघाडी घेतली. यावेळी उमेदवार सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक हे मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले. विजयाची खात्री झाल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. यावेळी राहुल महाडिक, केदार नलवडे, हणमंतराव पाटील, पृथ्वीसिंह नाईक, विश्वप्रतापसिंह नाईक, सागर खोत, दि. बा. पाटील, चंद्रकांत पाटील आदींनी सत्यजित देशमुख यांचे अभिनंदन केले. विजयानंतर शिराळा मतमोजणी ठिकाणाहून भव्य रॅली काढण्यात आली.
खुंदलापूरमध्ये नाईक यांना एकही मत नाही
खुंदलापूर या चांदोली अभयारण्यालगतच्या गावात मानसिंगराव नाईक यांना एकही मत मिळाले नाही, तर सत्यजित देशमुख यांना 228 मते मिळाली.
महिला तलाठ्याला आली चक्कर
आटपाडी येथील तलाठी भाग्यश्री चव्हाण यांना चक्कर आल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.