Published on
:
07 Feb 2025, 10:15 am
Updated on
:
07 Feb 2025, 10:15 am
कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यातील शिवणकवाडी येथे झालेल्या विषबाधा प्रकरणी आज (शुक्रवार) तिसऱ्या दिवशीही काही नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज सकाळी 25 नवीन रुग्णांमध्ये पोटदुखीच्या लक्षणे आढळली, मात्र प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत 755 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी 187 रुग्ण शासकीय (आय.जी.एम.) रुग्णालयात, तर 100 रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी दिली.
सध्या तीन लहान मुले आणि चार वृद्ध रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. विशेषतः एका ज्येष्ठ नागरिकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
विषबाधेच्या पहिल्या दिवशी बुधवारी 420 रुग्णांवर उपचार करण्यात आले होते, तर गुरुवारी हा आकडा 755 पर्यंत पोहोचला होता. मात्र आज (शुक्रवारी) नव्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली नाही, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे. तहसीलदार अनिल कुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी तात्पुरत्या उपचार केंद्रात तळ ठोकला असून, रुग्णसेवेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
जनतेने घाबरू नये : प्रशासनाचा संदेश
शिवनाकवाडीतील परिस्थिती आटोक्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात एक पथक 24 तास कार्यरत ठेवण्यात आले आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. त्वरित वैद्यकीय मदत दिली जाईल असे आवाहन तहसीलदार हेळकर, डॉ खटावकर, गटविकास अधिकारी घोलप यांनी केले आहे.