आ. शिवेंद्रराजे भोसले File Photo
Published on
:
25 Nov 2024, 12:28 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:28 am
सातारा : सातारा-जावली विधानसभा मतदारसंघावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणारे आ. शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा शहरातून चांगले मताधिक्य मिळाले. सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार्या मतदान केंद्राची उत्सुकता कार्यकर्ते व पदाधिकार्यांमध्ये निर्माण झाली आहे.
आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवत जिल्हा व राज्यस्तरावर अनेक विक्रम प्रस्थापित केले. निवडणूक काळात त्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली. आ. शिवेंद्रराजे भोसले यांना सर्वाधिक मताधिक्य कोणत्या मतदान केंद्रांतून कोण देणार? यावर चर्चा झाली होती. शिवेंद्रराजेंना विक्रमी मते मिळवून देण्यासाठी राजांचे कार्यकर्ते, पदाधिकारी झटले.
त्यामुळे सातारा शहरातील अनेक मतदान केंद्रांतून आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी भरघोस मते घेतली. आ. शिवेंद्रराजे भोसले यांना मिळलेल्या मतांची आकडेवारी पाहिली असता विरोधक त्यांच्या जवळही नाहीत. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी निवडणुकीत अत्यंत सूक्ष्मपणे प्रचार यंत्रणा राबवली होती. प्रचारावेळी सातारा शहरातून मताधिक्य देणार्या मतदान केंद्राबाबत चर्चा झाली होती. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रनिहाय आकडेवारीही जाहीर झाली आहे. जास्त मतदार असलेल्या काही मतदान केंद्रावर आ. शिवेंद्रराजेंना लीड मिळाले असून विरोधकांना कमी मते मिळाली आहेत. काही मतदान केंद्रांवर मतदारसंख्या कमी आहे, मात्र त्याठिकाणी आ. शिवेंद्रराजेंना मताधिक्य आहे. आ. शिवेंद्रराजेंची लीड मोजताना मतदारांची सरासरी गणली जाणार की मतदारसंख्येवरून लीड काढले जाणार याची उत्सुकता आहे. सर्वाधिक मताधिक्य देणार्या मतदान केंद्रातील प्रभागात विशेष लक्ष घातले जाणार का? याचीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
या केंद्रांवर घेतली सर्वाधिक मते
सातारा शहरात 243 ते 386 ही मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रातील 267 या मतदान केंद्रावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांना 625 तर अमित कदम यांना 66 मते आहेत. या मतदान केंद्रावर 734 इतके मतदान झाले आहे. मंगळवार पेठेतील या मतदान केंद्रात पोळवस्ती परिसराचा समावेश होतो. मतदान केंद्र क्र. 272 वर आ. शिवेंद्रराजे भोसले यांना 768 तर अमित कदम यांना 107 इतकी मते असून या मतदान केंद्रावर 903 इतके मतदान झाले आहे. व्यंकटपुरा पेठेतील धननीची बाग या परिसरात हे मतदान केंद्र आहे.मतदान केंद्र क्र. 336 मध्ये आ. शिवेंद्रराजे भोसले यांना 767 मते तर अमित कदम यांना 94 मते मिळाली आहेत. या मतदान केंद्रावर 879 इतके मतदान झाले आहे. शुक्रवार पेठेतील क्रांतीस्मृती अध्यापक महाविद्यालयात हे केंद्र होते.