टेंभुर्णी येथील प्रचार सभेत बोलताना खा. शरद पवार.Pudhari Photo
Published on
:
18 Nov 2024, 12:17 am
Updated on
:
18 Nov 2024, 12:17 am
माढा : महाराष्ट्र गेल्या तीन वर्षांत स्त्रियांवर सर्वाधिक अत्याचाराचे गुन्हे नोंद झाले. गेल्या दोन वर्षांत 67 हजार 387 इतके गुन्हे पोलिसांत नोंद झाले. राज्यातून 64 हजार मुली बेपत्ता झाल्या. नोकरीच्या शोधात 62 लाख मुले फिरताहेत. शेतकरी आत्महत्यांबाबत सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. अशांना पुन्हा सत्तेवर येऊ द्यायचे का, असा प्रश्न उपस्थित करत शेतकर्यांचे दुःख दूर करणार्यांच्या हातात सत्ता देण्याचे आवाहन खा. शरद पवार यांनी केले.
खा. पवार यांच्या रविवारी करमाळा व टेंभुर्णी येथे त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाल्या. टेंभुर्णी येथील सभेत त्यांनी हे आवाहन केले. यावेळी खा. पवार म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांवर आत्महत्येची वेळ येते. महायुती सरकार हे याबाबत बघ्याची भूमिका घेत होते. आ. बबनराव शिंदे यांच्यावर पवारांनी सडकून टिका केली. ते म्हणाले, शिंदे 40 वर्षे आमच्या सोबत असल्याचे सांगतात. मी त्यांच्या सोबत होतो. त्यांनी सांगेल ते काम मी केले.
सीना-माढा उपसा सिंचन योजना असो किंवा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना त्यांना सतत मदत करण्याची भूमिका घेतली. संकटाच्या काळात मात्र ते साथ सोडून गेले. कारण, विचारले तर ईडीची कारवाई टाळण्यासाठी म्हणून सांगण्यात आले. मलाही ईडीची नोटीस आली होती. मी चौकशीला जायला निघालो, तेव्हा ईडीचे अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी हात जोडून येऊ नका म्हणून सांगितले. ज्याचे हात स्वच्छ त्याला कोणाच्या बापाची भीती नाही. हे मात्र एक करमाळ्याला पळाला एक माढ्याला. यावेळी माळशिरसचे आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर, मोहोळचे उमेदवार राजू खरे, उमेश पाटील, संजय कोकाटे यांनी भूमिका मांडली.
तिकिटासाठी पाचवेळा माझ्याकडे आले
शिंदे बंधू तिकीटमागण्यासाठी माझ्याकडे पाच वेळा आले. मी नव्यांना संधी देऊ, असे सांगितले तर मुलाला संधी द्या म्हणाले. मला मागे जे जे सोडून गेले होते, त्यांच्या विरोधात नवीन लोकांना मी संधी दिली. विरोधात गेलेल्यांपैकी एकही निवडून आला नाही.
एकदा रस्ता चुकला की, गद्दाराला त्याची जागा दाखवलीच पाहिजे. साधंसुधं पाडायच नाही, जोरात पाडायचं. पवारांचा नाद केल्यावर काय होते, याचा संदेश महाराष्ट्रात जाऊ द्या, असे आवाहन पवारांनी केले.