इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताने जबरदस्त कामगिरी केली. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत इंग्लंडला 4-1 पराभवाची धूळ चारली. पाचव्या टी20 सामन्यात इंग्लंडला 150 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडियाची विजयी ट्रॅक पाहून क्रीडाप्रेमीही खूश आहेत. पण ही मालिका संजू सॅमसन आणि कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी काही खास गेली नाही. या दोघांना या मालिकेत सूर गवसला नाही. त्यामुळे या दोघांची चिंता क्रीडाप्रेमींना सतावत आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनला एकाच पद्धतीने पाच वेळा बाद केलं. शॉर्ट बॉल खेळताना येणारी अडचण इंग्लंडच्या गोलंदाजांनी बरोबर हेरली आणि त्याला पाच वेळा गिऱ्हाईक केलं. पण पाचवा टी20 सामना संजू सॅमसनसाठी वाईट गेला. कारण आता त्याला महिनाभर क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागणार आहे. कारण संजू सॅमसनला दुखापत झाली आहे. त्यातून सावरण्यासाठी त्याला काही काळ जाणार आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळाडूंमध्ये ऐनवेळी अदलाबदल झाली तर संजू सॅमसनचा विचार होणार नाही.
वानखेडे स्टेडियमवर 2 जानेवारीला टी20 मालिकेतील शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात पहिली फलंदाजी आल्यानंतर संजू सॅमसन स्ट्राईकला होता. जोफ्रा आर्चरने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनने जोरदार प्रहार केला आणि षटकार मारला. दुसरा चेंडू निर्धाव गेला. पण तिसरा चेंडूचा सामना करताना संजू सॅमसन चुकला आणि थेट चेंडू संजू सॅमसनच्या ग्लव्ह्जला लागला. यामुळे त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे. दुखापत पाहता फिजिओने मैदानात धाव घेतली आणि दुखापतीवर काही काळ काम केलं. संजू सॅमसनने पुढच्या काही चेंडूवर चौकार आणि षटकार मारला. पुढच्या षटकात शॉर्ट बॉलवर आऊट झाला.
इंग्लंडच्या डावात संजू सॅमसन फिल्डिंगला उतरला नाही. तेव्हाच क्रीडाप्रेमींच्या त्याची दुखापत गंभीर असावी असा अंदाज आला. त्यामुळे ध्रुव जुरेलने विकेटकीपिंग केली. पीटीआयच्या वृत्तानुसार, सॅमसनच्या उजव्या हात्या तर्जनीला फ्रॅक्चर झाला. स्कॅनमध्ये याचा खुलासा झाला. संजू सॅमसन ड्रेसिंग रुममध्ये परतला तेव्हा त्याच्या बोटाला सूज आली होती. त्यानंतर स्कॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला. संजू सॅमसनची दुखापत पाहता आता बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये जाईल. तिथे वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली उपचार होतील. त्यांच्या परवानगीनंतर क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळेल.
दुखापतीमुळे संजू सॅमसन रणजी ट्रॉफी स्पर्धेला मुकणार आहे. 8 फेब्रुवारीपासून 12 फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या जम्मू काश्मीर विरुद्ध केरळ सामन्यात खेळणार नाही. उपांत्यपूर्व फेरीत त्याला केरळकडून खेळण्याची संधी होती. मात्र त्याचं नशिब फुटकं निघालं आहे. दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ऋषभ पंत किंवा केएल राहुल जखमी झाला असता तर विकेटकीपर बॅट्समन म्हणून संजू सॅमसनला संधी मिळाली असती. पण आता ती संधीही गेली. आता संजू सॅमसन थेट आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसेल.