Published on
:
24 Nov 2024, 1:32 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:32 am
जयसिंगपूर : शिरोळ विधानसभा मतदारसंघात स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार व स्व. सा. रे. पाटील यांच्यानंतर शिरोळमध्ये दुसर्यांदा आमदार होण्याचा मान आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पटकाविला. त्याचबरोबर रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या मंत्रिपदानंतर तालुक्यात दुसर्यांदा मंत्रिपद हे आमदार यड्रावकरांनाच मिळाले. शिवाय झालेल्या निवडणुकीत आमदार यड्रावकर यांनी विकासकामाचा मुद्दा मांडत जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून केलेले समीकरण जुळवून आणत दुसर्यांदा आमदारकी मिळवली. त्यामुळे शिरोळ तालुक्याच्या विकासाला पुन्हा एकदा चालना मिळणार आहे.
शिरोळ तालुका हा चळवळीचा तालुका आहे. शिरोळचे प्रतिनिधित्व दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार, स्व. सा. रे. पाटील, स्व. दिनकरराव यादव, स्व. सरोजिनी खंजिरे, राजू शेट्टी, उल्हास पाटील आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे. 2019 च्या निवडणुकीत राजेंद्र पाटील-यड्रावकर हे अपक्ष निवडणुकीला सामोरे गेले आणि ते निवडून आले आणि निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात त्यांना आरोग्य राज्यमंत्रिपद मिळाले. मध्यंतरी राज्याच्या सत्ता बदलात आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आणि या पाच वर्षाच्या काळात इतिहासात प्रथमच तब्बल 1903 कोटीचा निधी तालुक्याच्या विकासासाठी आणला.
सध्याच्या निवडणुकीत आमदार यड्रावकर यांनी राजर्षी शाहू विकास आघाडी व महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले. यांना भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व स्वाभिमानी सावकर मादनाईक गट यांचे पाठबळ मिळाले. यांच्या विरोधात माजी आमदार स्व.सा.रे.पाटील यांचे चिरंजीव व दत्त समूहाचे अध्यक्ष व काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळाली. यांनी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या माध्यमातून क्षारपड विकास, विकसित शेती, सहकाराचे जाळे या पाठबळावर निवडणुकीला सामोरे गेले. त्याचबरोबर स्वाभिमानीकडून माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह 8 उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात होते. आमदार यड्रावकर यांनी विकासकामाचा मुद्दा मांडत जातीपातीचा मुद्दा बाजूला ठेवून प्रचार केला. यात यड्रावकर यांना तब्बल 40 हजार 616 मताधिक्याने दुसर्यांदा विजय मिळवला.
तसेच लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांने डिपॉझिट जप्त झाले होते. त्यानंतर शिरोळ विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी माजी आमदार उल्हास पाटील यांना मैदानात उतरवून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात टीकात्मक भाषण करून प्रचार केला होता; मात्र यात उल्हास पाटील यांचे डिपॉझिट जप्त झाल्याने स्वाभिमानीला मोठा धक्का बसला आहे. शिवाय काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील हे मोठ्या ताकदीने निवडणुकीला सामारे गेले होते; मात्र त्यांना 93 हजार 814 मते मिळाली. असे असले तरी काँग्रेसच्या या पराभवामुळे महाविकास आघाडीलाही धक्का बसला आहे. तालुक्यात प्रथमच 1903 कोटींची विकासकामे केल्याने तालुक्यातील जनतेमध्ये कामे पूर्ण झाल्याने समाधान होते. हाच मुद्दा पकडत यड्रावकरांनी समविचारी कार्यकर्त्यांना विकासाचे मॉडेल करण्याचा आत्मविश्वास दिला होता. पूर्ण प्रचारात कुणावरही टीका न करता केलेल्या विकासकामांवरच त्यांनी भर दिला होता.
सावकर मादनाईक ठरले ‘किंगमेकर’
शिरोळ विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत सावकर मादनाईक यांनी स्वाभिमानीतून निवडणूक लढविली होती. यांना 48 हजार मते मिळाली होती. सध्याच्या निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या भूमिकेच्या विरोधात सावकर मादनाईक जाऊन महायुतीबरोबर जाऊन प्रत्यक्षात प्रचारात उतरले होते. त्यामुळे झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानीला फक्त 25 हजार मते मिळाली. त्यामुळे सावकर मादनाईक गटाची मते मिळून शिरोळमध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, हातकणंगलेत अशोकराव माने व इचलकरंजीत राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याने सावकर मादनाईक हे ‘किंगमेकर’ ठरले आहेत.