Published on
:
18 Jan 2025, 1:40 am
Updated on
:
18 Jan 2025, 1:40 am
आटपाडी : अपंगत्वावर मात करत पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक एफ 46 प्रकारात रौप्य पदक पटकावणार्या सचिन सर्जेराव खिलारी (रा. करगणी, ता. आटपाडी) या माणदेशी युवकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, कृषी क्षेत्रात आपल्या कामाची मोहोर उठवणारे दिवंगत अॅड. सर्जेराव खिलारी यांचा सचिन हा चिरंजीव. अवघ्या 9 वर्षांचा असताना सचिन सायकलवरून पडला. त्याचा डावा हात मोडला; मात्र काही दिवसात जखम चिघळू लागली. या जीवघेण्या संकटातून तो बचावला; पण त्याच्या हाताच्या हालचालींवर कायमस्वरूपी मर्यादा आल्या. अभियंता असलेल्या सचिनने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावत देशवासीयांची मान गर्वाने उंचावली. पुण्यात असताना त्याने आझम कॅम्पसमध्ये पहिल्यांदा अॅथलेटिक्स ट्रॅक पाहिला. येथेच त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. अॅथलेटिक्समध्येच करिअर करण्याचा निश्चय त्याने केला. त्यानंतर प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली थाळीफेक व भालाफेक करण्यास सुरुवात केली. त्याच्या कामगिरीची दखल घेऊन 2 जानेवारी रोजी त्यास अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. शुक्रवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती दौपती मुर्मू यांच्याहस्ते पुरस्कार वितरण झाले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या
सचिन खिलारीने 2023 च्या जागतिक पॅरा अजिंक्यपद स्पर्धेत गोळाफेकमधील एफ 46 गटात 16.21 मीटर थ्रोसह सुवर्णपदक पटकावले. 2024 च्या जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले. 2022 मध्ये आशियाई पॅरा स्पर्धेतील सुवर्णपदकही त्याच्या नावावर आहे.