आ. विजयकुमार देशमुखFile Photo
Published on
:
24 Nov 2024, 12:31 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:31 am
सोलापूर : गेल्या चार निवडणुकांमध्ये भाजपपासून दूर असलेले मागासवर्गीय मतदार या निवडणुकीत भाजपच्या पाठीशी राहिले. त्यामुळे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आ. विजयकुमार देशमुख यांचा विजय सुकर झाला. लाडकी बहीण योजना, महिलांना एसटी प्रवासात सवलत आणि विकासाला मतदारांनी दिलेले प्राधान्य यामुळे आ. विजयकुमार देशमुख यांच्या गळ्यात पाचव्यांदा विजयाची माळ पडली.
सन 2004 पासून सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा विजयकुमार देशमुख यांच्या पाठीशी राहिला आहे. या निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे महेश कोठे ताब्यात घेतील असे चित्र रंगवले जात होते. परंतु गेल्या चार निवडणुकांमध्ये भाजपच्या पाठीशी नसलेली मागासवर्गीय जनता यावेळी भाजपच्या पाठीशी राहिल्यामुळे सलग पाचव्यांदा भाजपला मिळाले.1952 पासून निकाल पाहिल्यास सर्वाधिक वर्चस्व काँग्रेसने ठेवले होते. तब्बल सहा वेळा काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले होते. याशिवाय माकपचे उमेदवार विजयी झाले होते.
1990 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय लिंगराज वल्याण यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्याला सुरुंग लावला. त्यानंतर 1999 चा अपवाद वगळता हा मतदारसंघ भाजपच्या पाठीशी राहिला आहे. 2004 मध्ये विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेसचे ताब्यातून हा मतदारसंघ मिळवला. त्यानंतर सलग चार टर्म त्यांनी विजय मिळवला आहे. देशमुख पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे गेले होते. शरद पवार गटाचे महेश कोठे यांनी तगडे आव्हान दिले होते. भाजपमधील काही माजी नगरसेवकांनी बंडखोरी करून कोठेंना पाठिंबा दिला होता. माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी बंडखोरी करत देशमुखांसमोर आव्हान निर्माण केले होते. मात्र हे आव्हान पेल्यातील वादळ ठरले. लिंगायत समाजामताचे ध्रुवीकरण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र बंडखोर बनशेट्टी यांचा मतदारसंघात करिश्मा दिसला नाही. प्रचारादरम्यान देशमुख यांच्यावर मालकशाहीचा आरोप करून त्यांना संपवण्याचा विडा काही मंडळींनी उचलला होता. परंतु मतदारांनी विरोधकांचा हा डाव हाणून पाडला आणि भरघोस मते देशमुख यांच्या पारड्यात टाकून त्यांच्या विजयाचा मार्ग पाचव्यांदा सुकर केला.
पद्मशाली समाजाचे नागेश वल्याळ, दशरथ गोप यांनी महेश कोठे यांना पाठिबा दिला होता. कोठे यांना यावेळी संधी मिळण्याची दाट शक्यता होती. कोठे यांनी यापूर्वी या मतदारसंघातून मोठे आव्हान देऊन नशीब आजमावले होते. त्यानंतरच्या दोन निवडणुकांमध्ये त्यांनी इतर मतदारसंघातून वाट चोखाळली. मात्र सर्वच ठिकाणी त्यांना अपयश आले. चौथ्यांदा कोठे यांनी देशमुख यांच्या समावेत लढत दिली.