Published on
:
04 Feb 2025, 12:45 am
Updated on
:
04 Feb 2025, 12:45 am
सांगली : सांगलीत जीबीएस (गुईलेन बॅरे सिंड्रोम) या आजाराचे 11 रुग्ण उपचाराखाली आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. उपचाराखालील रुग्णांमध्ये सांगली जिल्ह्यातील 6 रुग्ण, जिल्ह्याबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील पाच रुग्णांमध्ये कर्नाटकमधील दोन रुग्ण आहेत.
राज्यात ‘जीबीएस’ या आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या तुलनेत सांगलीत या आजाराची साथ आटोक्यात आहे. आठवडाभरात सांगलीत 11 रुग्ण उपचाराखाली आले आहेत. यामध्ये सांगलीतील चिंतामणीनगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. वाळवा तालुक्यातील तीन रुग्ण जीबीएस बाधित आहेत. यामध्ये मर्दवाडी, आष्टा आणि सुरूल येथील रुग्णांचा समावेश आहे. विटा येथील एक आणि नेलकरंजी येथील एक रुग्ण उपचाराखाली आहे.
जिल्ह्याबाहेरील पाच रुग्ण उपचाराखाली आहेत. यामध्ये गुडमुडशिंगी (जि. कोल्हापूर), उम्ब्रज (जि. सातारा), संकेश्वर (जि. बेळगाव), बिबेवाडी (जि. पुणे) आणि रायबाग (जि. बेळगाव) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
या आजाराचे वेळेवर निदान आणि उपचार अतिशय गरजेचे आहे. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी केले.