Published on
:
24 Nov 2024, 12:21 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:21 am
सांगली : आपणच नंबर एक असल्याचे महायुतीने जिल्ह्यात शनिवारी सिद्ध केले. आठपैकी पाच मतदारसंघांत महायुतीने मैदान मारले; तर महाविकास आघाडीला होत्या त्या तीन जागा राखण्यात यश आले.
महायुतीतील भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ - सांगली, सुरेश खाडे - मिरज, गोपीचंद पडळकर -जत, सत्यजित देशमुख - शिराळा यांनी दिमाखदार विजय संपादन केला. निवडणुकीपूर्वी खाडे निवडणूक जिंकल्यात जमा आहेत, असे बोलले जात होते अन् झालेही तसेच. आघाडीचे नेते जयंत पाटील आणि डॉ. विश्वजित कदम यांना भाजपच्या उमेदवारांनी अक्षरशः घाम फोडला. जयंत पाटील सलग सातवेळा आमदार होते, या निवडणुकीत ते आठव्यांदा जिंकले. केवळ 13 हजार 23 मतांच्या आघाडीने ते विधानसभेत पोहोचले. आमदार डॉ. विश्वजित कदम यांना मताधिक्य मिळाले ते 30 हजार 064. हा आकडा 2019 च्या तुलनेत फारच नगण्य.
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात वादळातही दिवा लावला. त्यांनी माजी खासदार संजय पाटील यांचा 28 हजार 500 मतांनी पराभव केला आणि मताधिक्याचे सगळे अंदाज फोल ठरवले. शिराळा मतदारसंघात घडी घडी मेरा दिल धडके... असे वातावरण राहिले. महायुतीतील भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दहा वर्षे आमदार राहिलेले मानसिंगराव नाईक यांना पराभूत केले. जत मतदारसंघात भूमिपुत्राचा मुद्दा चांगलाच गाजला. त्याचा निकालावर फारसा परिणाम झाला नाही. येथे भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांचा 38 हजार 453 मतांनी पराभव केला.
खानापुरात बाबर 80 हजार मतांनी जिंकले
शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्यातील एकमेव उमेदवार सुहास बाबर यांनी 80 हजारांच्या मोठ्या फरकाने विजय मिळविला. जिल्ह्यातील हे सर्वाधिक मताधिक्य. गावा-गावातील सर्व गटा-तटांना, पक्षांच्या लहान-मोठ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणे त्यांना खूप फायद्याचे ठरले. खानापूरच नव्हे, तर आटपाडी तालुक्यातही बाबर यांचा गट आहे. स्थानिक संस्थांतही त्यांचा गट कार्यरत असतो. खेळायचे तर ग्रासरूटपासून... लाखमोलाचे म्हणजे स्वतःच एक पक्ष असलेले माजी आमदार अनिल बाबर यांचा प्रभाव.
सांगली, मिरजेत रणनीती यशस्वी
सांगलीत काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच दहा वर्षे आमदार असलेल्या भाजपच्या सुधीर गाडगीळ यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे स्नेही, जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम यांची ही रणनीती यशस्वी ठरली. जयश्री पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यातील मतविभागणीमुळे गाडगीळ यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. ते 36 हजार 135 मतांनी विजयी झाले.