Published on
:
01 Feb 2025, 1:24 am
Updated on
:
01 Feb 2025, 1:24 am
बेळगाव : बँकेत कार्यरत असल्याचे भासवत बँकेतून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आपली सात लाख रुपयांची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद अर्चना सुधीर शिंदे (वय 45, रा. नवी गल्ली, शहापूर) यांनी टिळकवाडी पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी पोलिसांत विठ्ठलराव अशोकराव घाटगे व त्यांची आई सरस्वती ए. घाटगे या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, एचडीएफसी बँकेत आरडी केल्यास जादा रक्कम मिळते असे सांगत आपल्याला रक्कम भरायला लावली. आपण रोज युपीआय व फोनपेद्वारे विठ्ठल यांना रक्कम पाठवत होते. ही रक्कम 1 लाख 35 हजार इतकी झाल्यानंतर ती पुन्हा काढून मुदतठेव ठेवल्यास जादा रक्कम मिळेल, असे सांगत गुंतवणूक करण्याचा सल्ला विट्ठलरावने दिला. त्यानुसार आपली विथड्रॉल स्लीपवर सही घेत 1 लाख 35 हजार काढून ही रक्कम त्याची आई सरस्वती घाटगे यांच्या नावे ट्रान्स्फर केली. आता आपली टिळकवाडी शाखेतून कित्तूर एचडीएफसी बँकेत बदली झाल्याचे सांगितले. यानंतर ठेव बँकेत ठेवा, असे सांगत विठ्ठलराव याने 4 लाख, 2 लाख 1 एक लाख असे टप्प्याटप्प्याने 21 मार्च 2023 ते 21 ऑक्टोबर 2023 या काळात आपल्याकडून काढून घेतले.
तुमची ठेव आता परत मिळणार असून, रक्कम 7 लाख 84 हजार 678 इतकी झाली आहे, असे सांगत आपल्याला एक पावती दिली. ही पावती घेऊन जेव्हा आपण कित्तूर येथील एचडीएफसी बँकेत गेलो तेव्हा त्यांनी अशी कोणतीही ठेव आपल्या बँकेत नसल्याचे सांगितले. शिवाय दिलेली ही पावती देखील बनावट असल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी टिळकवाडी पोलिस ठाण्यात यासंबंधी फिर्याद दिली आहे. यानुसार बनावट कागदपत्रे व फसवणूक कलमांतर्गत मायलेकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक परशुराम पुजेरी तपास करीत आहेत.