Published on
:
24 Nov 2024, 12:24 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:24 am
सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून सातारा जिल्हा हा शरद पवारांचा असलेला बालेकिल्ला महायुतीने भुईसपाट केला असून जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत महाविकास आघाडीला व्हाईट वॉश मिळाला. जिल्ह्यातील सातारा, माण, कराड उत्तर, कराड दक्षिण या चार मतदारसंघांत भाजपचे कमळ फुलले असून शिवसेना शिंदे गटाने पाटण व कोरेगाव या मतदारसंघांवर पुन्हा कब्जा मिळवला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वाई व फलटणमध्ये बाजी मारली. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील, माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण या ‘मविआ’च्या आमदारांचा दारूण पराभव झाला. सातार्यातून आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल 1 लाख 42 हजार 124 एवढे विक्रमी मताधिक्य मिळवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
काँग्रेसचे मातब्बर नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांनी 39 हजार 355 मतांनी पराभव केला. कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आ. बाळासाहेब पाटील यांचा भाजपच्या मनोजदादा घोरपडे यांनी 43 हजार 691 मतांनी पराभव केला. माण मतदारसंघातून भाजपच्या आ. जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रभाकर घार्गे यांचा 49 हजार 675 मतांनी दणदणीत पराभव केला. फलटण मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार दीपक चव्हाण यांचा अजित पवार गटाच्या सचिन पाटील यांनी 17 हजार 46 मतांनी पराभव केला.
सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या अमित कदम यांचा 1 लाख 42 हजार 124 एवढ्या विक्रमी मताधिक्यांनी पराभव केला. कोरेगाव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आ. महेश शिंदे यांनी आ. शशिकांत शिंदे यांचा 45 हजार 63 मतांनी पराभव केला. पाटणमधून शिवसेना शिंदे गटाचे आ. शंभूराज देसाई यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी अपक्ष सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावर 34 हजार 823 मतांनी विजय मिळवला. वाई मतदारसंघात राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आ. मकरंद पाटील यांनी शरद पवार गटाच्या सौ. अरुणादेवी पिसाळ यांचा 61 हजार 392 मतांनी पराभव केला.