मोदी हे बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवतात. हवाई चप्पल वापरणारा देखील यापुढे ‘हवाई’ प्रवास करेल अशी भाषणे ठोकतात. प्रत्यक्षात जमिनीवरील स्थिती वेगळी व भयावह आहे. युक्रेन, इराक, इराण, अफगाणिस्तानसारख्या देशांत युद्ध परिस्थितीमुळे बेकारी व भूखमरीचे संकट आहे. भारतात असे काहीच नसताना ‘बेकारी’चा स्फोट झाला व राज्यकर्ते निवडणूक विजयाच्या उत्सवात दंग आहेत. त्यांनी महाराष्ट्र जिंकला. त्या महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांत पाच हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बेरोजगारांनी वैफल्याच्या झटक्यात जीवन संपवले. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची स्थिती सध्या कशी आहे? तर अशी…
तळमळे अवघी प्रजा
उत्सवी मग्न राजा
साधितो शकुनि काजा।
वैरी घर भरिती स्वैरगति रमति।
प्रजाजन फिरती रानी।।
बोला, जय श्रीराम!
महाराष्ट्रातील विधानसभा विजयानंतर भाजप व त्यांच्या महायुतीत आनंदी आनंद आहे. महाराष्ट्रातील विजयाचे श्रेय सगळ्यांनी मिळून पंतप्रधान मोदी यांना दिले. त्यात शिंदे सेना व अजित पवारांची राष्ट्रवादीदेखील आहे. लोकांनी मोदी यांच्याकडे पाहून मते दिली, असे या कंपूचे म्हणणे आहे. हा आनंद उत्सव मोदी समर्थकांनी दिल्लीतही साजरा केला, पण देशातील युवक, शेतकरी यांच्या जीवनात खरेच आनंद निर्माण करण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले आहेत काय? देशावर आज रोजगाराचे महासंकट कोसळले आहे. देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. त्यात चाळीस टक्के लोक हताश-बेरोजगार आहेत. मोदी यांनी 81 कोटी लोकांना महिन्याला फुकट सरकारी राशन देऊन पोट भरण्याची व्यवस्था केली आहे. याचा अर्थ देशातील 81 ते 85 कोटी लोक हे बेरोजगार आहेत. त्यांना फुकट राशन देणे हा त्यावरचा उपाय मोदी यांनी शोधला आहे. जे आकडे समोर आले आहेत ते धक्कादायक आहेत. 14 मोठ्या राज्यांत बेरोजगारीचा उद्रेक आहे. त्यात पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारसारखी राज्ये सामील आहेत. महाराष्ट्रात जेमतेम 56 टक्के लोकांना रोजगार आहे व बाकीचे लोक मोकळे आहेत. सरकारी नोकर भरती, सार्वजनिक उपक्रमांतील भरती बंद आहे. साधारण 25 लाख सरकारी पदे रिकामी आहेत आणि पेपर लीक घोटाळ्यात लाखो नोकऱ्या अडकून पडल्या आहेत. भरती निघते तेव्हा एका एका पदासाठी हजारो अर्ज येतात. नोकर भरतीच्या ठिकाणी बेरोजगारांची चेंगराचेंगरी होते. शिक्षक, पोलीस, होमगार्ड भरतीच्या वेळी पोलिसांना लाठीमार करावा लागतो. मोदी यांनी तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली ‘अग्निवीर’सारखी
भंपक योजना
आणली. ती फेल गेली. भारतीय सैन्यात कंत्राटी लोक नेमण्याची त्यांची योजना अनोखीच होती. मोदी सरकारतर्फे अकुशल कामगारांना इस्रायलमध्ये नोकऱ्यांवर पाठविण्याची योजना प्रसिद्ध झाली, पण या नोकऱया भारतीय तरुणांना मरणाच्या खाईत ढकलणाऱ्या ठरल्या. इस्रायलमध्ये नोकऱ्या देणे हा निर्घृण प्रकार होता. तोसुद्धा अपयशी ठरला. सरकार म्हणते, देशात बेरोजगारी घटली आहे व लोकांचे बरे चालले आहे. ज्यांच्याकडे रोजगार आहे, त्यातील 78 टक्के लोकांची कमाई महिन्याला 15 हजारांच्या खाली आहे. स्वयंरोजगारवाल्यांची कमाई 8 हजारांच्या खाली आहे. मोदींचे सरकार आता या सगळ्यांनाही फुकट सरकारी राशन देणार काय? देशात आता रोजगार, नोकऱ्या निर्माण होत नाहीत. कारण उद्योगधंद्याला पोषक वातावरण देशात नाही. ईडी, सीबीआय, भाजप, इन्कम टॅक्सच्या दहशतीमुळे देशातील 5 लाखांवर मध्यम उद्योजकांनी पलायन केले व अन्य देशांत जाऊन त्यांनी गुंतवणूक केली. त्यामुळे मोठा रोजगार बाहेर गेला. गौतम अदानी या एका व्यक्तीभोवती देशाची अर्थव्यवस्था व उद्योग क्षेत्र घोटाळत आहे, पण संपूर्ण अदानी समूहात देशभरात दोन हजार लोकांनाही रोजगार मिळू शकलेला नाही व देशातील सार्वजनिक संपत्तीचे मालक अदानी यांना बनवले गेले आहे. स्वातंत्र्यानंतर टाटा, बिर्ला, बजाज, प्रेमजी, वाडिया, नारायण मूर्ती अशा अनेकांनी देशात गुंतवणूक केली व त्यातून मोठा रोजगार निर्माण झाला. पंडित नेहरू यांनी अनेक सार्वजनिक उपक्रमांची पायाभरणी करून त्यातून रोजगार दिला. मोदी काळात हे सर्व सरकारी उपक्रम मोडीत काढले आहेत.
मुंबईसारख्या सर्वाधिक रोजगार
देणाऱ्या औद्योगिक शहराचे महत्त्व कमी करण्यात आले. महाराष्ट्रासारख्या राज्यात उद्योग येऊच नयेत यासाठी अथक परिश्रम हे लोक घेताना दिसत आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, पंजाबात, केरळात आज नोकऱ्यांची वानवा आहे आणि मुंबईसह महाराष्ट्रातही नोकऱ्यांच्या नावाने ठणठण गोपाळा आहे. पंतप्रधान मोदी व त्यांचे लोक गरिबी, रोजगार, महागाईवर कधी बोलताना दिसत नाहीत. कारण सर्वच क्षेत्रांतला रोजगार संपला. ज्या प्रकारचे स्फोटक आणि भयग्रस्त वातावरण मोदी काळात तयार झाले, त्याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसला. त्यात जम्मू-कश्मीर, उत्तरेकडील व ईशान्येकडील राज्ये प्रामुख्याने आहेत. मोदी हे बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवतात. हवाई चप्पल वापरणारादेखील यापुढे ‘हवाई’ प्रवास करेल अशी भाषणे ठोकतात. प्रत्यक्षात जमिनीवरील स्थिती वेगळी व भयावह आहे. युक्रेन, इराक, इराण, अफगाणिस्तानसारख्या देशांत युद्ध परिस्थितीमुळे बेकारी व भूखमरीचे संकट आहे. भारतात असे काहीच नसताना ‘बेकारी’चा स्फोट झाला व राज्यकर्ते निवडणूक विजयाच्या उत्सवात दंग आहेत. त्यांनी महाराष्ट्र जिंकला. त्या महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांत पाच हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बेरोजगारांनी वैफल्याच्या झटक्यात जीवन संपवले. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची स्थिती सध्या कशी आहे? तर अशी…
तळमळे अवघी प्रजा
उत्सवी मग्न राजा
साधितो शकुनि काजा।
वैरी घर भरिती स्वैरगति रमति।
प्रजाजन फिरती रानी।।
बोला, जय श्रीराम!