सावंतवाडी ः शहरातून विजयी उमेदवार दीपक केसरकर यांची गाडीवरुन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.pudhari photo
Published on
:
24 Nov 2024, 1:40 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:40 am
सावंतवाडी विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सलग चौथ्यावेळी भरघोस मतांनी विजय झाला. विजयानंतर सगळीकडे एकच जल्लोष साजरा करण्यात आला. शिवसेना,भाजपा कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या विजयाचा गुलाल उधळत महायुतीचा विजय साजरा केला.यावेळी कार्यकर्त्यांनी दीपक भाई तुम आगे बढो...हम तुम्हारे साथ है...अशा घोषणा दिल्या.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर सलग चौथ्यादा निवडणूक रिंगणात होते. महाविकास आघाडीकडून उबाठा सेनेचे राजन तेली, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब व भाजपा पक्षातून बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढवलेले विशाल परब अशी चौरंगी लढत या मतदार संघात होती.मात्र या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांचा 39 हजार 899 मतांनी पराभव केला. अपक्ष विशाल परब याठिकाणी बाजी मारतील अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र ते देखील दुसर्या क्रमांकावर राहिलेल्या ऊबाठा सेनेचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रमाणेच पिछाडीवर फेकले गेले.
सुरुवातीला पोस्टल मतमोजणी आणि त्यानंतर वेंगुर्ला मतदान केंद्रांपासून मतमोजणी प्रक्रियेस सुरूवात झाली. केसरकर यांनी पहिल्या फेरीपासून एक हजारांचे लिड घेतले. त्यांनतर त्यांनी मागे वळुन पहिले नाही. हळूहळू दीड हजार त्यानंतर सहाव्या फेरीपर्यंत दीड ते दोन हजारांचे त्यांचे लिड कायम राहिले. सातव्या फेरीत दोन हजारहून अधिकचे लिड मिळाल्यानंतर केसरकर समर्थक व शिवसेना, भाजपा कार्यकर्त्यानी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली.पराभवाची छाया दिसताच राजन तेली यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा पसरला.
केसरकर यांनी 40 हजार मतांच्या फरकाने राजन तेली यांचा दारुण पराभव केला. केसरकरविसाव्या फेरीवेळी तहसील कार्यालय येथील मतमोजणी केंद्रावर दाखल झाले असता कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शिंदे शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांना देखील उचलून घेत कार्येकर्त्यांनी गुलाल उधळला. भाजप चे युवराज लखम सावंत भोसले, मनीष दळवी, महेश सारंग, दिनेश सारंग, संतोष राऊळ, विद्या परब, शिंदे शिवसेनेचे अशोक दळवी, योगेश तेली, राजन पोकळे, बाळा गावडे, सूरज परब आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.दुपारनंतर केसरकर यांच्या विजयाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.