कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपन्या, खासगी सावकार त्रास देत असल्यास आम्हाला कळवा. Pudhari File Photo
Published on
:
01 Feb 2025, 1:30 am
Updated on
:
01 Feb 2025, 1:30 am
बेळगाव : कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपन्या, खासगी सावकार त्रास देत असल्यास आम्हाला कळवा. आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, असा आदेश पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी बजावला आहे. संपर्कासाठी आयुक्तालयाने 9483931100 ही हेल्पलाईन सरू केली असून ती 24 तास सुरू राहणार आहे.
मायक्रो फायनान्सच्या नावाखाली राज्यातील जनतेची लूट केली जात आहे. खासगी बँका, सहकारी संस्था, खासगी सावकार सर्वसामान्यांची लूट करत आहेत. यासंदर्भात राज्य शासनाकडे राज्यभरातून 10 लाखांहून अधिक तक्रारी गेल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन राज्य शासनाने मायक्रो फायनान्सबाबत नवा अध्यादेश जारी केला आहे. शिवाय कुणी गरजवंतांना त्रास देत असेल तर संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही गृह मंत्रालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील पोलिस खाते सजग झाले आहे.
राज्यातील दहा लाख तक्रारींमध्ये बेळगाव जिल्ह्यातून तब्बल तीन लाख तक्रारी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुख तसेच पोलिस आयुक्तही याबाबत गंभीर बनले आहेत. पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी गुरुवारी यासंबंधीचे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. जर कुणी वसुलीसाठी त्रास देत असेल. कुणी बळजबरीने वसुली करत घराला टाळे ठोकणे, वस्तू जप्त करणे असे प्रकार करत असेल तर संबंधितांनी उपरोक्त क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधिताची तक्रार तातडीने त्याच्या अखत्यारित येणार्या पोलिस निरीक्षकांकडे पाठवली जाईल. पोलिस निरीक्षकाकडून त्याची शहानिशा करून त्यामध्ये तथ्य आढळल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्याबरोबरच पुढील कारवाई केली जाईल. ही हेल्पलाईन चोवीस तास सुरू राहणार असल्याचे या परिपत्रकात नमूद केले आहे.
गैरफायदा नको, सखोल तपास हवा
मायक्रो फायनान्सच्या नावाखाली छळवणूक केली जाते हे जरी खरे असले, तरी या हेल्पलाईनचा अथवा सरकारी अध्यादेशाचा गैरफायदा घेण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. गरजेसाठी कुणीतरी एखाद्याला रक्कम दिली असेल अन् ती मागितल्यानंतर पोलिस व कायद्याची भीती घालणार्यांची संख्याही कमी नाही. त्यामुळे या कायद्याचा आणि पोलिस हेल्पलाईनचा कुणी गैरफायदा घेऊ नये, यासाठी पोलिसांनी सखोल चौकशी करूनच पुढील कार्यवाही करावी, अशीही मागणी केली जात आहे.