Published on
:
16 Nov 2024, 2:49 pm
Updated on
:
16 Nov 2024, 2:49 pm
नवी दिल्ली : अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सरहद पूणे आयोजित दिल्लीत तालकटोरा स्टेडियम येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे मंजुर करण्यासाठी रेल्वे मंत्री अनुकूल आहेत. अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संयोजनकांना दिली असल्याचे संयोजकांनी सांगितले. आचारसंहिता संपल्यावर त्वरित याबाबत आदेश काढण्यात येतील असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्याला आश्वस्त केल्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संयोजकांना कळविले आहे.
रेल्वे मंत्रालयाने मराठी साहित्य संमेलनासाठी सवलतीत विशेष रेल्वे देता येणार नाही असे तोंडी कळविल्यानंतर पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या सवलतीच्या दरातील पुणे-दिल्ली विशेष रेल्वेबाबत चर्चा केली. इतर राज्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असताना यापूर्वी अनेकदा रेल्वे मंत्रालयाने ही सुविधा उपलब्ध केल्याचे अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणले त्यावर आपण हा निर्णय नक्की घेऊ असे मंत्र्यांनी आश्वस्त केल्याचे संयोजकांना कळविण्यात आले.
ही सुविधा उपलब्ध झाल्यास १५०० साहित्यप्रेमी रसिक नाममात्र दरात या रेल्वेतून प्रवास करू शकतील. या संमेलनाला ५००० पेक्षा अधिक साहित्यप्रेमी हजेरी लावण्याची शक्यता आहे. मराठी भाषा, अस्मिता आणि साहित्याचा हा उत्सव दिमाखदार होईल असे सरहदचे संस्थापक संजय नहार आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषाताई तांबे यांनी सांगितले.
Meta Keywords: special train approval, literary festival, Railway Minister support, Sahitya Sammelan, special train service