सुरतमध्ये बनला चक्क ट्रम्प यांच्या रूपातील हिराPudhari File Photo
Published on
:
22 Jan 2025, 12:01 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:01 am
सुरत : ‘हिर्यांची नगरी’ म्हणून देश-विदेशात ओळख असलेल्या गुजरातच्या सुरत शहरात आता एका कंपनीने अमेरिकेचे नुतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रुपातील हिरा बनवला आहे. सोमवारी अमेरिकेत ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची चर्चा सुरू असताना इकडे सुरतमध्ये या ‘ट्रम्प डायमंड’ची चर्चा सुरू होती. एका 4.5 कॅरेटच्या हिर्याला ट्रम्प यांच्या चेहर्याचा आकार देण्यात आला आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
सुरतच्या एका डायमंड फर्मने आपल्या लॅबमध्ये 4.5 कॅरेटच्या हिर्याला असा ट्रम्प यांचा आकार दिला. हा हिरा अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदी दुसर्यांदा विराजमान झालेल्या ट्रम्प यांना भेट म्हणून देण्यात येईल. ग्रीनलॅब डायमंडस्ने तीन महिन्यांमध्ये हा हिरा तयार केला आहे. त्याची किंमत सुमारे 8 लाख 50 हजार रुपये आहे. फर्मच्या मालकांपैकी एक स्मिथ पटेल यांनी सांगितले की आम्हाला या हिर्याला विशिष्ट आकारात बनवण्यासाठी तीन महिने लागले. त्यामध्ये त्याची निर्मिती, पैलु पाडणे व पॉलिश करणे यांचा समावेश होता. हा हिरा ट्रम्प यांच्या चेहर्याच्या एका बाजूसारखाच दिसावा असा आमचा प्रयत्न होता. हा हिरा भारत आणि अमेरिका यांच्यामधील स्नेहाचे एक प्रतीक आहे. सुरतच्या पाच अनुभवी कारागिरांनी तो तयार केला आहे. हा हिरा ट्रम्प यांना भेट म्हणून देण्यात येणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौर्यावेळी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या पत्नी व फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना 7.5 कॅरेटचा हिरा भेट म्हणून दिला होता. त्यावेळी या हिर्याची किंमत 20 हजार डॉलर्स होती असे म्हटले जाते.