Published on
:
24 Nov 2024, 12:36 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:36 am
बार्शी : लक्षवेधी ठरलेल्या व शेवटच्या निकालापर्यंत उत्कंठावर्धक लढत झालेल्या महाविकास आघाडीचे दिलीप सोपल यांनी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा 6472 मतांनी पराभव केला. दिलीप सोपल यांना 1,22,694, तर राजेंद्र राऊत यांना 1,16,222 मते मिळाली.1752 मते घेत विनोद जाधव तिसर्या क्रमांकावर राहिले.
निकाल जाहीर होताच सोपल समर्थकांनी शहरात गुलालाची मुक्तहस्ते उधळण करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. अटीतटीच्या लढाईत बार्शी विधनासभा मतदारसंघात अखेर सोपल यांनी सातव्यांदा विजय मिळवला. बार्शी विधानसभा मतदारसंघात पारंपरिक पद्धतीने दिलीप सोपल व राजेंद्र राऊत या दोघांमध्ये रंगतदार सामना रंगला होता. दिलीप सोपल यांनी यावेळीही पुन्हा उबाठा सेनेकडून रणांगणात उतरून मशाल हाती घेतली होती, तर महायुतीत भाजपा समर्थक आमदार राजेंद्र राऊत यांनी शिंदे सेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते. मतमोजणी सुरू झाल्यावर शेवटच्या निकालापर्यंत चुरस सुरू होती.
बार्शी शहराने सोपल यांच्या पारड्यात मतदान टाकले. ग्रामीण भागामध्ये राजेंद्र राऊत यांना साथ मिळत होती; मात्र बार्शी शहर व वैरागमधील मतदारांनी सोपल यांना साथ दिली. 14 टेबलद्वारे मतमोजणी करण्यात आली.24 फेर्या ठेवण्यात आलेल्या होत्या. 24 मतमोजणी पर्यवेक्षक, 24 मतमोजणी सहायकांती नियुक्ती करण्यात आली होती. 14 टेबल मशिन मोजणीचे आणि 10 टेबल पोस्टल मतमोजणीसाठी ठेवले होते.