इस्त्रोच्या फिरत्या विज्ञान प्रदर्शनात विविध उपगृहांची माहिती घेताना विद्यार्थी.Pudhari Photo
Published on
:
22 Jan 2025, 12:05 am
सातारा : इस्त्रो आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने फिरती स्पेस ऑन व्हील बस मंगळवारी सातारा येथील महाराजा सयाजीराव विद्यालयामध्ये आली होती. या बसमध्ये सातारा शहर व परिसरातील अनेक शाळांच्या सुमारे 5 हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली. बसमधील विविध उपकरणे, उपग्रहाच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक जिज्ञासा जागवण्यास मदत झाली. सातारा परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्पेस ऑन व्हील्स या बसमधून इस्रोने सादर केलेल्या उपक्रमांचा अनुभव घेतला.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची तसेच स्पेस सायन्स जागृकता वाढवण्यासाठी फिरत्या बसमधील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. ही बस देशभर फिरवण्यात येत आहे. मंगळवारी ही बस सातारा येथे आली. शहर व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहता यावे, याचे नियोजन महाराजा सयाजीराव विद्यालयातर्फे करण्यात आले होते. दिवसभर विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी या फिरत्या विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. दरम्यान, रयतचे सहसचिव बंडू पवार यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाचे उद्घााटन करण्यात आले. यावेळी रयतचे विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, सहाय्यक इन्स्पेक्टर प्राचार्य, दिनेश दाभाडे, नानासाहेब निकम, विज्ञान भारतीच्या मीना मालगावकर, प्रसाद क्षेत्रीय, डॉ. प्रमिला लाहोटी उपस्थित होते.
उपग्रहांच्या प्रतिकृती पाहून विद्यार्थी झाले थक्क
स्पेस ऑन व्हील्स या उपक्रमांतर्गत आलेल्या बसमध्ये इस्त्रोव्दारा निर्मित विविध प्रक्षेपक, उपगृहांच्या प्रतिकृती व त्यांची माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. तसेच भारताच्या मंगलयान, चांद्रयान, आर्यभट्ट, रोहिणी, भास्कर आदि उपगृहांच्या दळणवळणांची व्यवस्था, प्रक्षेपण तळ, पृथ्वीवरुन या उपग्रहांशी संवाद ठेवणारी यंत्रणा याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. टिव्हीवर पाहिलेले उपगृ्रहांच्या प्रतिकृती प्रत्यक्षात पाहून विद्यार्थी थक्क झाले.