स्वयंपाकघर- सुगरण

2 hours ago 2

>> तुषार प्रीती देशमुख

संतोष कांबळीस्वयंपाकाची प्रचंड आवड असणाऱया संतोषनेसुगरणया कार्यक्रमात दोन पदार्थ सादर केले. पाककलेमधील आवड कायम ठेवत त्याने केलेला खडतर जीवनप्रवास अनेकांसाठी सकारात्मकता शिकवणारा आहे

साम टीव्हीवरील ‘सुगरण’ या पाककृती कार्यक्रमात मुख्य शेफ म्हणून पाककृती सादर करत असताना आमच्या टीमने स्वयंपाकात रुची असलेल्या पुरुषांना त्यांनी केलेल्या पाककृतीच्या सादरीकरणासाठी आमच्या शोमध्ये सामील करून घेण्याचे ठरवले. यासंदर्भातली पोस्ट मी माझ्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केली. त्वरित माझा मित्र तुषार कांबळी याने मला संपर्क करून मला या शोमध्ये सहभागी व्हायचे आहे, असे सांगितले. तुषारने मला त्याचा एक मित्र संतोष कांबळी यालाही स्वयंपाकाची प्रचंड आवड असल्याचे सांगून त्याला शोमध्ये सहभागी करण्याबद्दल विचारणा केली तेव्हा त्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे आम्ही भेटायचे ठरवले. भेटी दरम्यान संतोषचे स्वयंपाकाशी असलेले नाते जाणून थक्क झालो. तेव्हा क्षणातच ठरवले की,  याला ‘सुगरण’ शोमध्ये नक्की कधी ना कधीतरी संधी द्यायची. आमच्या छान गप्पा रंगल्या. निघता निघता तुषारने संतोषची अजून एक ओळख करून दिली. तेव्हा कळलं, आपण ज्या संतोष कांबळीला भेटलो तो जगविख्यात लालबागच्या राजाची मूर्ती घडवणाऱया कांबळी कुटुंबातील तिसऱया पिढीतला आहे.

संतोषबद्दल आमच्या शोचे डायरेक्टर स्वप्नीलदादांबरोबर जेव्हा बोलणे झाले तेव्हा योगायोगाने महिन्याभरात माघी गणेश जन्मानिमित्त एपिसोड करायचे ठरले आणि हा एपिसोड संतोषदादाबरोबरच करायचा हे निश्चित झाले. संतोषने ‘सुगरण’च्या प्रेक्षकांसाठी दोन पदार्थ सादर केले. त्याची पाककलेमधील आवड जाणून घेतली तेव्हा त्याचा खडतर जीवनप्रवास सकारात्मकता शिकवून गेला.

संतोषदादा लहान असतानाच त्याच्या आईचे छत्र हरपले. आपल्या तिन्ही मुलांना आईची कमतरता जाणू द्यायची नाही हे संतोषदादांचे वडील रत्नाकर कांबळी यांनी ठरवले. रत्नाकरजी मुलांचा व स्वतचा डबा व जेवण बनवून मग ऑफिसला जायचे. वडिलांची ही सर्व मेहनत संतोषदादा लहानपणापासून पाहत असल्यामुळे त्याला जेवण बनविण्याची आवड निर्माण झाली. वडिलांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून संतोषदादाने स्वयंपाकघराची जबाबदारी स्वीकारली व तो अनेक पदार्थ बनवू लागला.

आर्थिक बाजू सक्षम होण्यासाठी काही वर्षे छोटे सिलेंडर पीच्या कंपनीमध्ये सेल्समन म्हणून, मग एका कुरियर कंपनीमध्ये त्याने नोकरी केली. संतोषदादांचे आजोबा मधुसूदन कांबळी यांनी मूर्ती घडवण्याची सुरुवात केली, त्यानंतर त्यांचे काका व्यंकटेश कांबळी हे मूर्ती बनवत. रत्नाकरजी निवृत्त झाल्यानंतर कारखान्यात पूर्ण वेळ देऊ लागले. वडिलांच्या आजारपणानंतर संतोषदादादेखील कारखान्यात जाऊन मदत करू लागला. त्यानंतर मूर्ती साकारण्यामध्ये त्याला आवड निर्माण झाली. लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्याचे काम अनेक वर्षे कांबळी कुटुंबीय करत आहेत. त्यात संतोषदादाने हे काम स्वीकारून ती परंपरा टिकवली. बघता बघता व्यवसायाचा व्याप इतका वाढला की, संतोषदादाने साकारलेल्या मूर्ती अनेक नामवंत व्यक्तींच्या घरी जाऊ लागल्या. या सगळ्यात मात्र संतोषदादाने स्वयंपाकाची आवड सोडली नाही. कारखान्यात पूर्ण दिवस काम करून दमून, थकून घरी गेल्यानंतर तो सगळ्यांसाठी आनंदाने स्वयंपाक करून सगळ्यांना जेवू घालायचा.

घरी कोणी पाहुणे आले की, संतोषदादा वेगवेगळे पदार्थ करायचा. हळूहळू नातेवाईकांना त्याच्या पाककलेबद्दल कळू लागले. रविवार म्हटले की, संतोषदादाने बनवलेले माशाचे कालवण असो वा फिश फ्राय, सगळेच जण या पदार्थांची चव घेण्यास येऊ लागले. म्हणतात ना, एकदा का लग्न झाले की पुरुष कितीही स्वयंपाकात हुशार असला तरीही तो नंतर स्वयंपाकघराकडे ढुंकूनही पाहत नाही. पण संतोषदादा व त्यांच्या पत्नी वैष्णवीताई यांच्यातील टय़ुनिंग जरा वेगळे आहे. तिच्यासाठी तो नेहमीच काही ना काहीतरी वेगळे पदार्थ करतो. तसेच कितीही थकलेला असला तरी रात्री घरी आल्यावर मुलाच्या आवडीचा पदार्थ बनवतोच. अन्नपूर्णादेवीचे आशीर्वाद लाभलेला खवय्या, सर्वगुणसंपन्न संतोषदादा म्हणतो की, स्वयंपाक करणं ही अशी कला आहे की, जेव्हा कधी तुम्ही थकलेले असता तेव्हा तुम्ही एखादा पदार्थ बनवता त्यावेळी त्या प्रक्रियेत तुमचा थकवा नाहीसा होतो आणि बनवलेला पदार्थ जेव्हा समोरची व्यक्ती खाऊन दाद देते तेव्हा मिळालेला आनंद हा सर्वश्रेष्ठ असतो.

संतोषदादाच्या हातचे फोडणीचे वरण म्हणजे सुख आहे. त्याची चव अनेकदा मी यांच्याकडून शिकूनसुद्धा मला जमली नाही. किंबहुना कुणीही बनवलेले फोडणीचे वरण त्यांच्यासारखे होऊ शकत नाही याची मला खात्री आहे. कारण त्यांचे प्रेम त्या वरणाच्या फोडणीमध्ये मिसळलेले असते. कोणतीही डिग्री न घेणारा असा हा खवय्या, पाककलेवर भरभरून प्रेम करणारा सुगरण, जगप्रसिद्ध लालबागच्या राजाचा मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळीदादा.

[email protected]

 (लेखक यूटय़ूब शेफ आहेत.)

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article