कोल्हापूर : हद्दवाढीसंदर्भात आयोजित बैठकित महापालिका अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या खडाजंगी सुरू असताना.Pudhari File Photo
Published on
:
04 Feb 2025, 12:36 am
Updated on
:
04 Feb 2025, 12:36 am
कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ नाही. सार्वजनिक सुविधा निर्माण करायला जागा नाही. विकास आराखड्यात दर्शविल्याप्रमाणे सुविधांसाठी जागाच नसल्याचे हद्दवाढ कृती समितीने स्पष्ट केले असून महापालिकेने हद्दवाढीसाठी ठोस भूमिका घ्यावी, उपलब्ध हद्दीत सुविधांसाठी जागा आहे का याचा अहवाल 24 तासांत द्यावा. अन्यथा महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासमोर जवाब दो, असे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दिला. हद्दवाढ कृती समिती आणि महापालिका अधिकार्यांच्यात हद्दवाढीवरून खडाजंगी झाली. माजी महापौर आर. के. पोवार यांच्यासह कृती समितीचे सदस्य आक्रमक झाले.
अॅड. बाबा इंदुलकर यांनी लोकसंख्येनुसार शहरात जागेची उपलब्धता आहे काय, अशी विचारणा केली. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी एक वर्षापूर्वी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या, त्याचे पुढे काय झाले? हद्दवाढ नाही म्हणून विकास नाही आणि म्हणून कर नाही. माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी ग्रामीण भागातील नागरिक मनपाच्या सुविधा वापरूनही हद्दवाढीविरोधात भूमिका घेत आहेत. माणुसकी म्हणून आम्ही शहरातून सुविधा देत आहोत. भाजपचे महेश जाधव यांनी ग्रामीण भागातील गैरसमज दूर करण्यात मनपाची यंत्रणा कमी पडत असल्याचे सांगितले. चंद्रकांत यादव यांनी मनपा प्रशासनाकडून हद्दवाढीसाठी ठोस भूमिका घेत नाही आहे, असे सांगितले. किशोर घाटगे यांनी राज्य शासनाने हद्दवाढीचा थेट निर्णय घेण्याची मागणी केली. कॉ. दिलीप पवार यांनी हद्दवाढीबाबत पाठपुरावा का केला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
प्रशासनातर्फे बोलताना सहा. संचालक नगररचना विनय झगडे म्हणाले, हद्दवाढीसाठी मनपा प्रशासन सकारात्मक आहे. प्रशासनाने कोणतीही हयगय केलेली नाही. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी हद्दवाढ समर्थक आणि विरोधक घटकांची एकत्रित बैठक होण्याची गरज व्यक्त केली. यावेळी बाबा पार्ट, सतीशचंद्र कांबळे, अशोक भंडारे, महादेव पाटील, सचिन पोवार, उदय भोसले, दत्ता टिपुगडे, प्रसन्न शिंदे, चंद्रकांत सूर्यवंशी, अमर शिंदे, सुशील भांदिगरे, सुनील पाटील, संग्राम जरग आदी उपस्थित होते. महापालिकेतर्फे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, एन. एस. पाटील आदी उपस्थित होते.