हिंगोली जिल्हा परिषदेत दिव्यांगांची हेळसांड:एक वर्षापासून बंद असलेली लिफ्ट सुरू करण्याची मागणी

22 hours ago 1
हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये लाखो रुपये खर्चुन बसविण्यात आलेली लिफ्ट मागील एक ते दोन वर्षापासून बंद असून त्यामुळे दिव्यांग व्यक्तींची मोठी हेळसांड होऊ लागली आहे. दिव्यागांच्या हिताच्या गप्पा मारणाऱ्या जिल्हा परिषदेला लिफ्ट दुरुस्त करता येत नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हिंगोली जिल्हा परिषद मागील काही दिवसांपासून या ना त्या कारणाने चांगलीच चर्चेत येऊ लागली आहे. जिल्हा परिषदेला लागलेली आग, जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची निकृष्ठ कामे, रस्ते दुरुस्तीच्या वाढलेल्या तक्रारी, गावकऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन नेहमीच चर्चेचा विषय बनले आहेत. त्यातच आता औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये चौकशी पथकाने तपासणीसाठी काढून ठेवलेले कॅशबुक व इतर साहित्य जळून खाक झाल्याने जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांचा कारभार देखील चव्हाट्यावर येऊ लागला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नागरीकांच्या प्रश्नांकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा परिषदेने दिव्यांगांच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केले आहे. एकीकडे दिव्यांगांना मदत करण्याच्या गप्पा मारणाऱ्या जिल्हा परिषदेला कार्यालयातील लिफ्ट दुरुस्त करता येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. जिल्हा परिषदेत दररोज ग्रामीण भागातून शेकडो गावकरी कामासाठी येतात. यामध्ये दिव्यांग व्यक्तींचाही समावेश आहे. दिव्यांग व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटावयास जाण्यासाठी लिफ्ट बसविण्यात आली आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र मागील एक ते दोन वर्षापासून कार्यालयातील लिफ्ट बंद पडली आहे. त्यामुळे कार्यालयाच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दिव्यांगांना पायऱ्या चढून जावे लागत असून त्यामुळे एखादे वेळी गंभीर प्रसंग ओढवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विशेष म्हणजे कार्यालयात दिव्यांग कर्मचारीही असून या कर्मचाऱ्यांनाही लिफ्ट बंद असल्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे दिव्यांग नागरीकांमधून तिव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. जिल्हा परिषदेने तातडीने लिफ्ट दुरुस्त करून दिव्यांगांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी केली जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article