बेदम मारहाण Pudhari File Photo
Published on
:
03 Dec 2024, 9:56 am
Updated on
:
03 Dec 2024, 9:56 am
आ. अमोल खताळ यांचा फ्लेक्स लावल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री तालुक्यातील घुलेवाडी येथे घडली. पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मारहाण करणारे हे काँग्रेस कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, गोविंद यादव पानसरे यांचा पुणे येथे कॉन्ट्रक्टचा व्यवसाय आहे. ते आपल्या मूळ गावी घुलेवाडी रविवार (दि. 1) रोजी आले होते. त्यांच्या भावाने व इतर मित्रांनी आ. अमोल खताळ यांचा अभिनंदनचा फ्लेक्स घुलेवाडी येथील मौनगिरी चौकात लावलेला होता. हा फ्लेर्क्स काढून टाकावा, असे काँग्रेसचे कार्यकर्ते ऋतिक राऊत व इतर सांगत असल्याचे त्याने पानसरे यांना सांगितले. त्यांचा चुलत भाऊ प्रतिक पानसरे, ऋतिक राऊत, प्रतिक राऊत व गावातील काहीजण दिसले. गोविंद पानसरे हे चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला उभी करुन गणेश उर्फ प्रतिक भास्कर पानसरे याच्याकडे गेले.
प्रतिक राऊत व ऋतिक राऊत यांनी गोविंद यांना शिवीगाळ सरू केली. प्रतिक भास्कर पानसरे व रुतिक राऊत यांनी पानसरे यांना गाडीच्या बाहेर ओढून लाथाबुक्यांनी मारहाण केली, तसेच धमकी दिली. यावेळी सुनित प्रदिप डेरे याने भांडणाची सोडवासोडव केली. झटापटीत पानसरे यांच्या खिश्यात असलेले 33 हजार रुपये गहाळ झाले. यानंतर गोविंद पानसरे यांना उपचारासाठी दवाखान्यांत हलविण्यात आले.
याबाबत गोविंद यादव पानसरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गोविंद पानसरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ऋतिक राऊत, प्रतिक राऊत, गणेश उर्फ प्रतिक भास्कर पानसरे (घुलेवाडी) यांच्यासह दोन अनोळखी इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान आमदार अमोल खताळ यांना या हाणामारीची माहिती समजताच ते जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात जाऊन त्यांनी चौकशी केली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख उपस्थित होते. आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले.