साकूर (ता. संगमनेर) येथील कान्हा ज्वेलर्स या दरोडयातील आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 15 लाख 95 हजार 425 रुपयांचे सुमारे वीस तोळे सोने हस्तगत करण्यात आले. दयावान ऊर्फ मनोज बाळासाहेब साठे (वय 25, रा. गोरडवाडी, ता.माळशिरस, जि. सोलापूर), अजय ऊर्फ भोर्या ऊर्फ भोल्या बाळू देवकर (वय 22, रा. कौठेयमाई, ता. शिरूर, जि. पुणे), योगेश अंकुश कडाळे (वय 27, रा. धामणी, लोणी, ता. आंबेगाव, जि.पुणे), आकाश ठकाराम दंडवते (वय 28, रा. मलठण, ता. शिरूर, जि.पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य आरोपी धोंड्या महादू जाधव याच्यासह मन्ना ऊर्फ सूरजसिंग ऊर्फ अजयसिंग (रा. पंजाब) यांचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, साकूर येथे 11 नोव्हेंबर रोजी दुपारी संकेत सुभाष लाळगे यांच्या कान्हा ज्वेलर्स या दुकानावर पाच जणांनी दरोडा टाकला होता. त्यात पिस्तुलाचा धाक दाखवत व हवेत गोळीबार करत दरोडेखोरांनी 52 लाख 41 हजार 600 रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लुटून नेले होते. यातील दोन दरोडेखोरांना ढोकरी येथील डोंगर परिसरातून ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नंतर पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार संतोष लोढे, फुरकान शेख, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, अमोल कोतकर, जालिंदर माने, अमृत आढाव, संतोष खैरे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, महादेव भांड, अर्जुन बडे व भाग्यश्री भिटे यांची पथके कार्यरत होती.
सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मनोज साठे (रा. माळशिरस, जि. सोलापूर) या आरोपीचे नाव निष्पन्न झाले. त्याने चोरलेले सोने त्याचा साथीदार धोंड्या जाधव (रा. निघोज, ता. पारनेर) व सुनील ऊर्फ नील चव्हाण (रा. गणेश पेठ, पुणे) यांच्याकडे दिले आहे. त्यानुसार पोलिसांनी पुणे येथून सुनील चव्हाणला (वय 28) ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्यातील सोन्याचे दागिने अभिषेक महेश तळेगावकर (रा. रविवार पेठ, पुणे) यांच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. पथकाने अभिषेकला गाठले. त्याने ते सोने सोमवार पेठेतील सोनाराला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी मग पंचांसमक्ष जाऊन संबंधित सोनाराकडून 15 लाख तीन हजार 425 रुपयांचे 195.250 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले.
दरम्यान, आरोपी मनोज साठे बेलवंडी फाटा (ता. श्रीगोंदा) येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेेथे रविवारी सापळा रचून व रील आरोपींना संशयिताचा शोध त्यांना ताब्यात घेतले. त्यात वरील आरोपींचा समावेश आहे. त्यांच्याकडून 92 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी अजय ऊर्फ भोल्या बाळू देवकर याच्या ताब्यातून तीन हजारांचा गावठी पिस्तूल, दोन हजारांची दोन जिवंत काडतुसे व आरोपींकडून प्रत्येकी एक मोबाईल जप्त केला. त्यांनी दोन फरार आरोपींची नावे सांगितली. दरम्यान, सर्व आरोपींना घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.