Devmali Gram Panchayat: भूमी अभिलेख विभागाची कुचराई; देवमाळी ग्रा. पं. ला नाहक त्रास!

3 hours ago 1

देशोन्नती वृत्तसंकलन
अचलपूर (Devmali Gram Panchayat) : जागेच्या तब्बल ५४ मोजणीसाठी हजाराचा भरणा करून एक वर्ष पूर्ण झाले आहे; मात्र भूमी अभिलेख उपअधीक्षक यांनी अद्यापही मोजणी करण्याचे सौजन्य दाखविले नाही. सदर भूमी अभिलेख अधिकाऱ्याला याबाबत ग्रामपंचायत आणि पंचायत समितीने दोन वेळा स्मरणपत्र दिले; मात्र तरीसुद्धा सदर अधिकाऱ्याने मोजणीची कुठलीही हालचाल तर केली नाहीच शिवाय ते तब्बल वर्षभर मूग गिळून बसले. त्यांच्या मूग गिळून बसण्याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर आता संबधित अधिकाऱ्याला देवमाळीचे ग्रामस्थ विचारणार आहेत.

देवमाळी ग्रामपंचायत (Devmali Gram Panchayat) भवन बांधकाम करण्यासाठी लाखो रूपयांचा निधी शासनाने मंजूर केला. मात्र ज्या जागेवर ग्रामपंचायत भवन बांधण्याची परवानगी शासनाने दिली, त्या जागेवर फातिमा कॉन्व्हेंटने अनेक वर्षापासून अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण करताना फातिमा कॉन्व्हेंट ने दोन रस्तेही सोडले नाही. सर्व जागा ताब्यात घेऊन सभोवताल कम्पाउंड घातले आहे. (Devmali Gram Panchayat) इमारत बांधकाम करण्यासाठी जागा मोकळी करून द्यावी यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेतला होता; मात्र या विरोधात फातिमा शाळेने न्यायालयात अपील दाखल केले.

याच दरम्यान जागा मोजणे गरजेचे असल्याने ग्रामपंचायतीने भूमी अभिलेख विभागाकडे (Land Records Department) वर्षभरापूर्वी तब्बल ५४ हजार रुपयांचा भरणा केला. पैसे भरूनही भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी कर्मचारी मोजणीसाठी फिरकत नव्हते. एके दिवशी ते मोजणीसाठी फातिमा शाळेत दाखल झाले; मात्र फातिमा शाळा प्रशासनाने त्यांना न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याचे सांगितले आणि कुठल्याही बाबीची चाचपणी न करता ते आल्या पावली परत गेले. तेव्हापासून तर आजपर्यंत भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षक यांनी मोजणी करण्यासाठी सातत्याने हुलकावणी दिली.

दरम्यान मोजणीसाठी विलंब होत असल्याने (Devmali Gram Panchayat) ग्राम पंचायतने उपअधीक्षक (Land Records Department) भूमी अभिलेख, अचलपूर यांना २८मार्च २४ रोजी पत्र देत शासकीय कामासाठी जागेची मोजणी करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमुद केले. इतकेच नव्हे, तर जागा मोजणी साठी कुठल्याही प्रकारचा न्यायालयाचा स्थागनादेश नाही, असेही त्यांच्या निदर्शनास

आणून देण्याचा पत्राद्वारे प्रयत्न केला. मात्र तरीसुद्धा उपअधीक्षक यांना जाग आली नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या सदर अधिकाऱ्याला ११ जुलै २०२४ रोजी स्वतः गट विकास अधिकारी सुधीर अरबट यांनी पत्र लिहिले. ५४ हजार रीतसर शुल्क भरून सुद्धा जागा मोजणीचा अहवाल अप्राप्त असल्याचे नमूद करीत सदर अहवाल त्वरित पाठवावा अशीही विनंतीवजा मागणी बीडिओ अरबट यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून केली. बीडिओ यांच्या पत्रालाही उपअधीक्षक यांनी केराची टोपली दाखवली.

उपअधीक्षक यांना आता तरी जाग येणार का?

अपर आयुक्त यांनी सदर (Devmali Gram Panchayat) अतिक्रमणाबाबत नुकताच एक आदेश पारित केला आहे. प्रथम जागेची मोजणी करून अतिक्रमण निश्चिती करावी आणि त्यानंतर अतिक्रमण आढळल्यास तात्काळ अतिक्रमण काढावे, असे आदेशात नमूद केले आहे. अपर आयुक्त यांनी आदेश देताना न्यायप्रविष्ठ प्रकरणाबाबत कुठेही नमूद केले नाही; मात्र भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकांना कुठे आणि काय ‘न्यायप्रविष्ठ’ वाटले, याबाबत आता त्यांनीच खुलासा करावा, असे देवमाळी येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सोमवारी ग्रामपंचायत देणार पत्र

अपर आयुक्त यांनी दिलेल्या आदेशासह ग्रामपंचायतीचे कव्हरिंग लेटर २ फेब्रु. २०२५ रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला सादर करणार आहे. सदर पत्र तयार झाले असून सदर पत्रावर (Devmali Gram Panchayat) ग्रामपंचायतचे प्रशासक महादेव कासदेकर आणि सचिव टी. एस. पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रयत्नानंतरही उपअधीक्षक कोणती भूमिका घेतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article