हिंगोली (Hingoli Assembly Elections) : हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी उद्या बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात एकूण 1 हजार 23 मतदान केंद्र असून, त्यापैकी निम्मे म्हणजेच 515 मतदान केंद्रांवर वेब कास्टींगद्वारे करडी नजर राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी सांगितले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 ही भयमुक्त, खुल्या वातावरणात आणि पारदर्शी पद्धतीने पार पडावी, यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन काम करत आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोग जिल्ह्यातील 50 टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टींगद्वारे देखरेख ठेवणार आहे. हिंगोली जिल्ह्यात 92-वसमत 328, 93-कळमनुरी 352 आणि 94-हिंगोली 343 अशा एकूण तीन विधानसभा मतदारसंघामध्ये 1 हजार 23 मतदान केंद्र आहेत.
92-वसमत विधानसभा मतदार संघात 164 मतदान केंद्रावर, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 180 आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 171 मतदान केंद्रावर वेबकास्टींगची सुविधा तयार करण्यात आली असून, या सर्व मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी दिली आहे.