हिंगोली (Hingoli Crime) : शहरातील आडत व्यावसायिक बँकेमध्ये रक्कम भरण्यासाठी आले असता बुधवारी भरदिवसा त्यांच्या स्कुटीच्या डिकीतून साडेतीन लाख रूपये काढून नेल्याची घटना घडल्याने व्यापार्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील गोपाल अग्रवाल (मित्तल) यांचे आडत दुकान असून १९ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास त्यांनी यूनियन बँकेतून साडेतीन लाख रूपयाची रक्कम काढली होती. सदर रक्कम संत नामदेव नागरी सहकारी बँकेत भरण्याकरीता दुपारी ३.१५ वाजता स्कुटीवरून आले होते. त्यांनी स्कुटी उभी केल्यानंतर एका अनोळखी भामट्याने त्यांना तुमचे पैसे पडले, अशी बतावणी केल्याने अग्रवाल हे पैसे उचलण्याकरीता जाताच एका मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी डिकीतील साडेतीन लाख रूपयाची पिशवी पळविली.
याचवेळी अग्रवाल स्कुटीजवळ गेल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसून आला. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर सपोनि गणपत जाधव, आनंद बनसोडे, संजय मार्के, संतोष करे, अजहर पठाण यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. चोरट्याच्या शोधासाठी पोलिसांना रवाना करण्यात आले.