हिंगोली (Hingoli) :- येथील संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेला अविज पब्लिकेशनतर्फे दि. 30 जानेवारी 2025 रोजी सलग तिसऱ्यांदा नागरी विभागातून प्रथम क्रमाकांचा राज्यस्तरीय बँको पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सलग तिसऱ्यांदा नागरी विभागातून प्रथम क्रमाकांचा राज्यस्तरीय बँको पुरस्कार देऊन गौरव
संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 14 शाखा कार्यरत असून सर्व शाखा संगणकीकृत आहे. या शाखांमधील सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन (online)प्रणालीनुसार सुरु आहेत. सहकार क्षेत्रातील तज्ञ निवड समितीमार्फत झालेल्या पतसंस्थेच्या मुल्यांकनानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा व सर्व आयुधांचा वापर करून सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करणाऱ्या संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेची नागरी विभागातील बँको पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. लोणावळा येथे आयोजित कार्यक्रमामध्ये राज्यातील सहकार क्षेत्रातील विविध विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हिंगोली या पतसंस्थेला माजी सहकार आयुक्त श्री. चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते बँकिंग क्षेत्रातील प्रतिष्ठित समजल्या जाणारा प्रथम क्रमाकांचा राज्यस्तरीय बँको पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बँकोचे संचालक श्री. अविनाश शिंत्रे, श्री. अशोक नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. हा पुरस्कार संत नामदेव पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. जनकराजजी खुराणा व संचालिका सौ. शशीताई जनकराजजी खुराणा यांनी स्विकारला.
संत नामदेव पतसंस्थेच्या या यशामध्ये पतसंस्थेचे संचालक, सभासद, ग्राहक, अधिकारी व कर्मचारी यांनी बहुमोल योगदान दिले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संत नामदेव पतसंस्थेचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.