Published on
:
24 Jan 2025, 1:11 pm
Updated on
:
24 Jan 2025, 1:11 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (25 जानेवारी) रोजी खेळवला जाणार आहे. कोलकाता येथे खेळला गेलेला मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने सात विकेट्सने जिंकला. आता भारत दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, या दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडने त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
इंग्लंडने मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये रंगणार आहे. इंग्लिश संघाने दुसऱ्या सामन्यासाठी एक बदल केला आहे. पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गस एटकिन्सन खेळणार नसल्याचे वृत्त आहे. त्याच्या जागी ब्रायडन कार्सला संधी देण्यात आली आहे.
पहिल्या सामन्यात एटकिन्सनने 2 षटके टाकली आणि 38 धावा दिल्या. तसेच, त्याला विकेट मिळाली नाही. एटकिन्सन फलंदाजी देखील करतो. पण पहिल्या सामन्यात तो काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने 13 चेंडूत फक्त दोन धावा काढल्या आणि बाद झाला.
जेमी स्मिथ संघाचा 12 वा खेळाडू
इंग्लंडकडून इतर कोणत्याही बदलांबद्दल अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. स्मिथ 12वा खेळाडूत असेल असे निश्चितच आहे. तो गरज असेल तेव्हाच मैदानात येईल. पहिला सामना वाईटरित्या गमावल्यानंतर, संघात बदल होण्याची शक्यता होती आणि तेच घडले आहे. इंग्लंडसाठी समस्या अशी आहे की जर त्यांनी दुसरा सामनाही गमावला तर मालिकेत बरोबरी साधणे त्यांच्यासाठी खूप कठीण जाईल.
दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन
बेन डकेट, फिल साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडेन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.