लातूर(Latur) :- गेल्या दोन वर्षांपासून गावातील अवैध दारु विक्री बंद व्हावी म्हणून आपण सतत प्रयत्न करत आहोत. पण याला कुठेही यश येत नाही. या अवैध दारु (Illegal liquor) विक्रीमुळे गावातील जवळपास 25 युवक आणि पुरुष यांनी दारुच्या नशेमध्ये आत्महत्या (Suicide)केलेली आहे. ज्यामुळे कमी वयामध्ये अनेक महिला विधवा झालेल्या आहेत, अशी आपबिती कथन करीत गावात होणारी अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी; अन्यथा प्रजासत्ताक दिन सामूहिक आत्मदहन करू असा इशारा लातूर तालुक्यातील शिऊर गावचे सरपंच प्राध्यापक सचिन सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिला आहे.
आजपर्यंत जवळपास 25 जणांची दारूच्या नशेत आत्महत्या!
लातूरच्या जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार आदींना हे निवेदन देण्यात आले आहे. शिऊर येथे गेल्या 25 वर्षांपासून गावात अवैधरित्या देशी दारुची विक्री होत आहे. या अवैध दारु विक्रीमुळे गावातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे. या अवैध दारु विक्रीमुळे गावातील मोठ्या प्रमाणामध्ये युवक हा व्यसनाधीन बनत चाललेला आहे. तरी येणाऱ्या 26 जानेवारी 2025 वार रविवारपर्यंत गावातील अवैध दारु विक्री बंद करावी, अन्यथा गावातील महिलांसह रविवारी, 26 जानेवारी 2025 रोजी झेंडावंदन झाल्यानंतर मी सरपंच व गावातील महिला हे अवैध दारु विक्री बंद होत नसल्याबाबत आम्ही सामुहिकरित्या शिऊर (ता.जि. लातूर) येथे आत्मदहन करणार आहोत, असा इशारा लोकनियुक्त सरपंच प्रा. सचिन विष्णू सूर्यवंशी यांनी निवेदनात दिला आहे.