लातूर(Latur) :- लातूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यावर (Illegal business) कारवाई केली म्हणे..! ज्या लातूरमध्ये रोज कोट्यवधींचा गुटखा खुलेआम, ‘राज’ रोस विकला जातो, त्या शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 22 जानेवारीला फक्त 2 लाख 28 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा (Gutkha) व सुगंधित तंबाखू जप्त केली. यामुळे पोलीस रेकॉर्डवर आणखी कारवाई व आणखी एक गुन्हा नोंदला गेला, हे मात्र खरे!
2 लाख 28 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त
राज्यामध्ये सर्वत्र गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीला बंदी आहे. मात्र लातूरमध्ये अगदी सहजरित्या गुटखा व सुगंधित तंबाखू कुणालाही उपलब्ध होते. लातूर शहरच नव्हे, तर लातूर जिल्ह्यामध्ये गावागावांमध्ये हा गुटखा व सुगंधी तंबाखू अगदी बिनदिक्कत, दिवसाढवळ्या राजरोस विकली जाते. इतकेच नव्हे, तर अगदी शासकीय-प्रशासकीय कार्यालयांच्या कानाकोपऱ्यांमध्येही या गुटखा व सुगंधित तंबाखूच्या (Aromatic tobacco) सेवनाचे पुरावे ठसले गेले आहेत. शासकीय कार्यालयांच्या आजूबाजूला अनेक पानटपऱ्यांमधून गुटखा विक्री अगदी जोमात होत आहे. या विक्रीला पाबंदी कुठेच दिसून येत नाही. मध्यंतरी नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षकपदी शहाजी उमाप हे रुजू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाची वाट न बघता पोलिसांनी गुटख्याबाबत वातावरण एकदम ‘टाइट’ केले होते.
लातूरचे पोलीस अधीक्षकच ‘अधूनमधून’ निर्देश देतात
मात्र ते वातावरण आता राहिले नाही. लातूरचे पोलीस अधीक्षकच ‘अधूनमधून’ निर्देश देतात अन् मग स्थानिक गुन्हे शाखा पथक ‘अशा’ अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबविते. 22 जानेवारीला लातूरच्या गुळ मार्केट ते सम्राट चौक या रस्त्यावरील श्रीयश ट्रेडर्स नावाच्या दुकानावर धाड टाकून सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने वेगवेगळ्या कंपनीचा 2 लाख 28 हजार 854 रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व गुटखा करण्यात जप्त केला. तसेच सागर गोविंदराव दरेकर, (वय 29 वर्ष, राहणार अहिल्यानगर, लातूर) याच्याविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला. या पथकात पोलीस अमलदार रियाज सौदागर, मनोज खोसे, जमीर शेख, राहुल कांबळे, नितीन कठारे, चालक पोलीस अमलदार चंद्रकांत केंद्रे यांनी कामगिरी नोंदवली. बाकी सर्वत्र गुटखा मात्र सर्रास विकला जातो, तो कुठून येतो? हा खरा सवाल आहे.