एका मराठा तरुणाने आत्महत्या केल्याने मनोज जरांगे पाटील सरकारवर चांगलेच संतप्त झाल आहेत. तुम्हाला अजून किती बळी हवे आहेत? माणसं मेलीत माणसं… सरकारने भावना शून्य होऊ नये. आरक्षणाबाबतचा लवकर निर्णय घ्या. तुम्ही जर मजा बघत असाल तर तुम्हाला फळं भोगावी लागतील, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे.
मला सरकारला विचारायचंय की तुम्हाला किती बळी हवी आहेत? तुम्हाला काहीच वाटत नाही का? अरे माणसं मेलीत माणसं. किमान माणसं मेल्यावर, विद्यार्थी आत्महत्या करायला लागल्यावर माणसाचं काळीज हवं. तुम्हाला जशी मुलं आहेत, तशी मराठ्यांनाही मुलं आहेत. तुम्ही त्यांनाही तुमची लेकरं समजा. आमचा विनाकारण संयम ढळला तर नाईलाजाने वेगळ्या पद्धतीने भयंकर आंदोलन करावं लागेल, असा संतप्त इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
संयम सुटला तर…
इतर कोणी भलत्याच कारणाने आत्महत्या केली तर त्यांच्यासाठी सर्व काही करता. इथे राजकारणासाठी आत्महत्या होत नाही. मुलं रात्र न् दिवस अभ्यास करतात. पदरी निराशा येते. त्यामुळे ते आत्महत्या करत आहेत. तुम्ही आरक्षणच देत नाही. ही कोणती मग्रुरी आहे. इतका वाईट विचार मराठ्यांबाबतचा सरकारकडे असू नये. सरकारने भावना शून्य होऊ नये. आमची पोरं मरत असतील तर या सरकारचं काय करायचं? असा संतप्त सवाल करतानाच मी मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगतो की, माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची आत्महत्या होता कामा नये. आमची माणसं मरत आहेत. तुम्ही मजा बघत असाल तर त्याची फळं भोगावी लागणार आहेत. जाहीरपणे सांगतो. उद्या परवा कॅबिनेट आहे. शिंदे समितीच्या मागण्या मार्गी लावा. तुम्हाला शेवटचं सांगतो. नाही तर आमचा संयम सुटणार, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.
हात जोडून विनंती…
राज्यातील मराठा बांधवांना हातजोडून विनंती आहे. मी समाजासाठी प्रयत्न करत आहे. आरक्षण मिळवणारच आहे. जिव्हारी लागेल असं पाऊल उचलू नका. काल बीडमध्ये आत्महत्या झाली. सिल्लोडमध्ये आत्महत्या झाली. माझी हात जोडून विनंती आहे, आत्महत्या करू नका. नंबर गेला तर गेला, अजून शिकू. आरक्षण मिळाल्यावर पुन्हा शिका. पण कायमचं आयुष्य संपवू नका, असं आवाहन जरांगे यांनी केलं.