Published on
:
23 Jan 2025, 5:16 am
Updated on
:
23 Jan 2025, 5:16 am
नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महापालिकेने रविवार कारंजावरील बहुचर्चित यशवंत मंडई इमारतीतील गाळेधारकांना हटवून, इमारत खाली करण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात वकीलांचा अभिप्राय देखील घेण्यात आला असून आयुक्त मनिषा खत्री यांच्या निर्देशांनंतर पोलिस संरक्षणात इमारत खाली केली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त मयुर पाटील यांनी दिली आहे.
यशवंत मंडई, जी ४५ वर्षांपूर्वी रविवार कारंजा येथे उभारली गेली होती, ती आता जर्जरावस्थेत असल्याचे स्ट्रक्चरल ऑडीटद्वारे स्पष्ट झाले आहे. अनेक भाडेकरूंनी गाळे सोडले असले तरी, २२ भाडेकरूंनी ताबा सोडलेला नाही. महापालिकेच्या नोटीसविरोधात या भाडेकरूंनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तेव्हा न्यायालयाच्या निर्देशानुसार मविप्र समाजाचे अभियांत्रिकी महाविद्यालय या त्रयस्थ संस्थेमार्फत यशवंत मंडईचे स्ट्रक्चरल ऑडीट होऊन अहवाल न्यायालयासमोर सादर केला गेला. ज्यात इमारत धोकादायक असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे गाळेधारकांचा दावा निकाली काढून न्यायालयाने त्यांना गाळे खाली करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता महापालिकेने पोलिस संरक्षणात इमारत रिकामी करण्याची तयारी सुरू केली आहे.
वकीलांचा अभिप्राय प्राप्त
यशवंत मंडईतील काही गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयातही दावा केला आहे. जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात कोणत्याही स्वरूपाची स्थगिती वा अन्य आदेश दिलेले नाहीत. यासंदर्भात महापालिकेच्या जाहिरात व परवाने विभागाने वकिल पॅनलचा अभिप्राय घेतला आहे. त्यानुसार इमारत तसेच संबंधित गाळेधारकांविरोधात कार्यवाही करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे वकिलांनी स्पष्ट केले आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर महापालिकेने यशवंत मंडईची इमारत खाली करण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशांनंतर पोलिस संरक्षणात सदर इमारत खाली केली जाईल.
- मयुर पाटील, उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलन), महापालिका.