Published on
:
19 Nov 2024, 11:05 am
Updated on
:
19 Nov 2024, 11:05 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : सात सत्रांतील घसरणीनंतर आज मंगळवारी (दि.१९) भारतीय शेअर बाजाराने (Stock Market) जोरदार कमबॅक केले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने (Sensex) तब्बल १ हजार अंकांची वाढ नोंदवत ७८,४५१ च्या अंकाला स्पर्श केला. तर निफ्टीने (Nifty) ३०० अंकानी वाढून २३,७५० चा टप्पा पार केला. बाजारातील आजची वाढ ही दोन महिन्यांतील सर्वात मोठी आहे. त्यानंतर शेवटच्या तासात दोन्ही निर्देशाकांची तेजी कमी झाली. सेन्सेक्स २३९ अंकांच्या वाढीसह ७७,५७८ वर बंद झाला. तर निफ्टी ६४ अंकांनी वाढून २३,५१८ वर स्थिरावला.
ऑटो आणि रियल्टी शेअर्स खरेदीमुळे तेजीला चालना
क्षेत्रीय निर्देशांकातील मीडिया, ऑटो, रियल्टी, आयटी आणि फार्मा ०.५ ते २.५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर मेटल, ऑईल आणि गॅस, पीएसयू बँक निर्देशांक घसरले. विशेषतः ऑटो आणि रियल्टी शेअर्समध्ये झालेल्या व्यापक खरेदीमुळे तेजीला चालना मिळाली. हे दोन्ही निर्देशांक प्रत्येकी १.५ टक्क्यांनी वाढले. तर आयटी निर्देशांकही कालच्या घसरणीतून सावरत ०.८ टक्के वाढला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी ०.९ टक्के वाढले.
कार्पोरेट कंपन्यांची कमकुवत कमाई आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या माऱ्यामुळे सोमवारी बीएसई सेन्सेक्सने करेक्शन मोडमध्ये प्रवेश केला होता. आज या घसरणीला ब्रेक लागला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये खरेदी दिसून आली.
बीएसई सेन्सेक्सवरील ३० पैकी १७ शेअर्स आज हिरव्या रंगात बंद झाले. यात एम अँड एमचा शेअर्स सर्वाधिक ३.५ टक्के वाढला. टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, सन फार्मा, टाटा मोटर्स, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर रिलायन्स, एसबीआय, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, मारुती, एलटी हे शेअर्स घसरले. बीएसईवरील एकूण ४.०५९ शेअर्समध्ये आज व्यवहार दिसून आला. यातील २,३५३ शेअर्स तेजीसह बंद झाले. तर १,६१२ शेअर्समध्ये घसरण झाली. ९४ शेअर्समध्ये कोणताही चढ-उतार दिसून आला नाही.
एका वृत्ताने शेवटच्या तासात चित्र बदलले
संमिश्र जागतिक संकेत असतानाही बाजाराने आज सकारात्मक सुरुवात केली होती. पण शेवटच्या तासात दोन्ही निर्देशांकांची तेजी अचानक कमी झाली. अमेरिकेने युक्रेनला रशियावर हल्ला करण्यासाठी आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम (ATACMSs) क्षेपणास्त्राचा वापर करण्यास परवानगी दिल्याच्या वृत्ताचे बाजारात काही प्रमाणात पडसाद उमटले. यामुळे सेन्सेक्स दिवसांच्या उच्चांकावरून ८०० अंकांनी खाली आला.