उद्योजक गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. एकीकडे त्यांच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग आला असताना आता दुसरीकडे अमेरिकेच्या सिक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशनने दोघांनाही त्यांच्यावरील आरोपांवर उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली आहे. या नोटिसीला 21 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्यासह 7 जणांवर सौर ऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी तब्बल 2 हजार 200 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. अमेरिकेच्या शेअर बाजार नियामिक मंडळाने न्यूयॉर्क ईस्ट डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या माध्यमातून 21 नोव्हेंबर रोजी गौतम अदानी आणि सागर अदानी यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार अदानींना 21 दिवसांच्या आत आपल्यावरील आरोपांना उत्तर द्यावे लागेल किंवा फेडरल सिव्हिल प्रक्रियेच्या नियम 12 अंतर्गत प्रस्ताव सादर करावा लागेल. जर अदानींनी योग्य उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणार आहे. त्यामुळे अदानींना नियोजित वेळेत उत्तर द्यावे लागेल.
सेबीनेही मागवले स्पष्टीकरण
लाचखोरीच्या आरोपावरून अमेरिकन न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर सेबीने तपासासाठी पंबर कसली आहे. समूहाने बाजारावर प्रभाव टाकणारी माहिती उघड करण्याच्या नियमांचे उल्लंघन केले आहे का? याचा सेबी शोध घेत आहे. सेबीने केनियातील विमानतळ विस्तारीकरणाचा करार रद्द करणे आणि अमेरिकेतील प्रकरणाबाबत उत्तरे मागवली आहेत, मात्र समूहाने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. सेबीने स्टॉक एक्स्चेंजच्या अधिकाऱयांकडूनही माहिती मागवली आहे. दरम्यान, हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांवरही सेबीने अदानी समूहाची चौकशी केल्याची माहिती आहे.
अदानी समूहाला बँका कर्ज देणे थांबवणार
लाच प्रकरणामुळे अदानी समूहाला निधीची कमतरता भासू शकते. कारण काही बँका अदानी समूहाला नवीन कर्जे देण्यावर तात्पुरती बंदी घालण्याचा विचार करत असल्याचे व्रेडिट विश्लेषकांनी म्हटले आहे. समूहाची विद्यमान कर्जे कायम राहतील असेही सांगण्यात येत आहे. समूहाच्या ग्रीन एनर्जी व्यवसायासाठी ही सर्वात मोठी चिंतेची बाब असून देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय बँका आणि रोखे गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक मर्यादित करू शकतात. याचा अदानी समूहाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
11 कंपन्यांवर कोणताही आरोप नाही
अदानी समूहाच्या 11 पब्लिक कंपन्यांपैकी कुठल्याही कंपनीवर अमेरिकेत कोणत्याही प्रकारचे आरोप नसल्याचा दावा अदानी समूहाचे मुख्य आर्थिक अधिकारी जुगेशिंदर रॉबी सिंह यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट प्रसिद्ध केली आहे. अदानी ग्रीन एनर्जीच्या एका कंत्राटावरून जे आरोप केले जात आहेत ते संपूर्ण व्यवसायाच्या केवळ 10 टक्के आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी काही डिटेल्स सविस्तरपणे समोर ठेवले जातील, असेही सिंह यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.