Published on
:
24 Jan 2025, 12:12 am
Updated on
:
24 Jan 2025, 12:12 am
कोणत्याही घटनेची किंवा बातमीची शहानिशा न करता अफवा पसरवून देणे आपल्याकडे आता अत्यंत घातक अशा पातळीवर येऊन पोहोचले आहे. आपले संन्यस्त जीवन शांतपणे व्यतित करणार्या पालघरमधील साधूंना कोणीतरी मुले पळवून नेणारी टोळी असल्याची अफवा पसरवून दिली आणि त्या निष्पाप, निरागस जीवांना जमावाच्या मारहाणीत बळी जावे लागले. काय घडले आहे किंवा घडत आहे हे पाहण्याची प्रवृत्ती आपल्या समाजात वेळोवेळी दिसून येते.
तुम्ही रस्त्याने गाडी चालवत असता आणि रहदारीमध्ये कुणा मोटारसायकलचा कुणा स्कुटीला धक्का लागलेला असतो. तिथे काही बाचाबाची पण होत असते. अशावेळी आपण रहदारीतून आपले वाहन पुढे काढताना डाव्या बाजूला वळून दिसेनासे होईपर्यंत ती घटना पाहत राहतो. अर्धवट लक्ष असल्यामुळे इथे आपलाही अपघात होण्याची शक्यता असते. दुर्दैवाने ते कोणीच लक्षात घेत नाही. जळगाव जवळ नुकताच घडलेला रेल्वे अपघात हा अपघात नसून हाराकिरी आहे, असे आमचे म्हणणे आहे. रेल्वे रुळावरून जात असताना चाकाचे आणि रुळाचे घर्षण होताना, ठिणग्या उडणे ही नित्याची बाब आहे. डब्याच्या पायरीवर बसून प्रवास करणार्या काही लोकांनी अशा ठिणग्या उडत असल्याचे पाहिले आणि रेल्वेला आग लागली असल्याची ओरड केली. तत्काळ काही लोकांनी साखळी ओढून गाडी थांबवली. गाडी थांबल्याचे पाहताच किमान शंभर एक लोक नेमके काय झाले आहे याची पाहणी करण्यासाठी डब्या खाली आले आणि बाजूच्या रेल्वे ट्रॅकवर उभे राहिले. हेच त्यांचे वर्तन अत्यंत घातक ठरले. विरुद्ध दिशेने येणारी दुसरी रेल्वे भरधाव वेगाने बाजूच्या ट्रॅकवर आली आणि त्या ट्रॅकवर उभे असणार्या लोकांना चिरडून पुढे गेली. काय झाले असेल ते असो परंतु डब्यामध्ये शांतपणे बसून असलेले लोक वाचले आणि आगाऊ कुतूहल असलेले लोक यामध्ये मरण पावले किंवा जखमी झाले.
विरुद्ध दिशेने आणि बाजूच्या रुळांवर येणारी रेल्वे वेगात होती आणि ती आपल्या मार्गाने व्यवस्थित निघून गेली. घडलेल्या घटनेत रेल्वे प्रशासनाची काहीही चूक नाही. प्रत्यक्ष जाऊन काय घडले आहे हे पाहण्याचा आगाऊपणा काही लोकांनी केला आणि तोच त्यांच्या जीवावर बेतला असे दिसून येते. किती काळ आपण असे जीव गमावणार आहोत हे समजण्यास मार्ग नाही. काहीही घडले असेल तर फार झाले तर खिडकीतून किंवा दरवाजातून वाकूनही पाहता आले असते. पाच-दहा लोक उतरल्याबरोबर अति चिकित्सक असे आणखी शंभर लोक उतरले आणि मृत्यूला सामोरे गेले. अवघ्या काही क्षणात अनेक प्रवाशांचे प्राण गेलेले होते आणि त्यांची प्रेते भयाण अवस्थेत बाजूच्या ट्रॅकवर पडलेली होती हे द़ृश्य अंगावर काटा आणणारे होते. कुणीतरी रेल्वेला आग लागली म्हणून ओरडले. काही लोकांनी साखळी ओढून रेल्वे थांबवली आणि उड्या मारण्यास सुरुवात केली. या ठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे की एकाच डब्यातील लोकांनी उड्या मारलेल्या आहेत कारण याच डब्यातील काही लोकांनी आग लागल्याची अफवा सोडून दिली होती. एका मेंढराने उडी टाकली म्हणून कळपातील इतर मेंढ्या पण उडी टाकतात त्यापेक्षाही भयावह अशी परिस्थिती माणसांची होऊन बसली आहे.