Published on
:
24 Jan 2025, 12:18 am
Updated on
:
24 Jan 2025, 12:18 am
एखाद्याने त्याचे ध्येय जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर ठरवावे हे ज्याच्या त्याच्या कुवतीवर आणि कौटुंबिक पार्श्वभूमीवर अवलंबून असते. बर्याच जणांना शालेय जीवनात स्वत:चे करिअर निश्चित करणे आणि ते साध्य करण्यासाठी प्रोत्साहित केले जात नाही. किंबहुना आपणास असे सांगितले जाते की, आताच काय बनायचे आहे ते निश्चित करू नकोस. पदवी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत तुझी उद्दिष्टे अनेकवेळा बदलतील त्यामुळे जरा धीर धर!
1972 साली लाईफ मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या जॉन गोडार्ड या ध्येयवेड्या भन्नाट तेवढ्याच जिगरबाज साहसवीराची सत्यकथा उद्बोधक आणि प्रेरणादायी आहे. गोडार्ड ज्यावेळी 15 वर्षांचा होता त्यावेळी त्याला त्याची आजी आणि काकी, त्याने काय बनावे आणि काय बनू नये, याबद्दल फारच वाद घालताना दिसल्या. त्याच्या करिअरबद्दल इतरांच्या त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे लक्षात घेऊन आपण आयुष्यात काय करावयास पाहिजे, याबाबत गोडार्डने एकांतात बसून खूप विचार केला. त्याने स्वतःस काय साध्य करावयाचे आहे याबाबतची दोन, चार, दहा नव्हे तर सुमारे 127 उद्दिष्टे डायरीत लिहून काढली अन् झपाटल्यागत या ध्येयांचा माग काढत पाठलाग तो करू लागला. त्याने 10 नद्यांच्या खोर्यांना भेटी देण्याचे ठरवले. त्याला डॉक्टर बनून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करावयाचे होते. जगातील प्रत्येक देशास भेट द्यावयाची होती. त्याला वैमानिक बनून आकाशाच्या अनंत पोकळीत विहार करायचा होता. माको फेलोने जगप्रवास केलेल्या मार्गावरूनच त्याला प्रवास करायचा होता. पसायदना रोड परेडमध्ये त्याला घोडेस्वारी करायची होती. शिवाय त्याला बायबलचे पान न् पान वाचायचे होते. जगविख्यात साहित्यिक विल्यम शेक्सपिअर, थोर विचारवंत प्लुटो, अॅरिस्टाटल अन् डिकन्ससारख्या सुमारे डझनभर साहित्यिकांचे सर्व साहित्य त्याला वाचायचे होते. त्याला इगल स्काऊटचा सदस्य बनायचे होते. पाणबुडीतून सातासमुद्रापार प्रवास करायचा होता. बासरी अन् व्हायोलिन वाजविण्याचा मनमुराद आनंद लुटायचा होता. चर्चच्या धर्मप्रसारात त्याला योगदान द्यायचे होते. महत्त्वाचे म्हणजे त्याला संपूर्ण ‘एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका’ वाचायचा होता आणि लग्न करून संसारही थाटायचा होता. गोडार्डने या असाध्य अशा अशक्यप्राय ध्येयांची यादी केवळ कागदावर न ठेवता ती पूर्ण करण्याचा सपाटाच लावला. 1972 साली त्याने जेव्हा त्याचा 47 वा वाढदिवस साजरा केला, तोपर्यंत त्याने त्याची 103 ध्येये अन् उद्दिष्टे साध्य केली होती. आता तो स्वतःचे अनुभव सांगताना ध्येये कशी ठरवावीत अन् ती कशी सफल करावीत, याचे अचूक मार्गदर्शन करणारा जगातला महागडा प्रभावी वक्ता बनला होता.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे काही विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी बनण्याचे ध्येय बाळगतात. काही त्यात सफलही होतात. पण, काही उमेदवारांचे ध्येयपूर्तीसाठी करावे लागणारे नियोजन चुकल्याने ते अपयशी होतात. काही विद्यार्थी सफल होतातही, पण बहुसंख्य उमेदवारांचे नियोजन चुकल्याने त्यांची सनदी अधिकारी बनण्याची गाडी चुकते. आर्थिकद़ृष्ट्या कमकुवत उमेदवारांना प्रथम छोटी नोकरी व नंतर मोठे ध्येय हा फॉर्म्युला बराच उपयुक्त ठरू शकतो. माझा स्वतःचा अनुभव असाच आहे. पहिल्याच प्रयत्नात पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा पास झाल्याने थेट आयएएस होणार या भ्रमात मी होतो. पण, मुलाखतीचे गणित बिघडल्याने सनदी नोकरशहा बनण्याची संधी हुकली. सर्वसाधारण व्यक्ती आयुष्यातील पूर्वीचा अनुभव आणि त्यात ती यशस्वी झाली होती की नाही यावर आधारित स्वत:चे ध्येय ठरविते. पण, सद्यस्थितीत स्वत:चे उद्दिष्ट ठरविताना मला काय हवे आहे, कोणते करिअर मला करायचे आहे? माझी गरज काय आहे, हा प्रश्न आधी स्वतःला विचारायला हवा. जर भूतकाळावर आधारित ध्येये ठरवली तर आपण आपला भविष्यकाळ मर्यादित आणि संकुचित बनवतो.
एकदा उद्दिष्ट ठरवले की, ते साध्य करण्यासाठी आवश्यक क्षमता, पात्रता आणि गुणवत्ता आपल्यात निर्माण होतेच म्हणून जितक्या लवकर तुम्ही एखादे ध्येय साध्य करण्याचे जेवढे जास्त प्रयत्न कराल तितका तुमचा उत्साह वाढत जाईल. यशाची उंच उंच शिखरे तुम्ही पादाक्रांत कराल.