Los Angles Fire : अमेरिकेचा सर्वात पॉश परिसर म्हणून ओळख असलेल्या लॉस एंजिल्स गेल्या सहा दिवसापासून आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. या परिसरातील जंगलाला लागलेली आग रहिवाशी भागापर्यंत पोहोचली आहे. ही आग इतकी भयंकर आहे की तिचा अंदाजा लावता येणार नाही. एक दोन एकर नव्हे तर 40 हजार एकरावर ही आग पसरली आहे. या 40 हजार एकराच्या परिसरात जिथे पाहावं तिथे आगच आग दिसत आहे. या भयानक आगीमुळे सर्वच जण घाबरून गेले आहेत. या आगीत आतापर्यंत 12 हजार इमारती जळून खाक झाल्या आहेत. यात हॉलिवूडमधील बड्या कलाकारांची घरेही आहेत. हॉलिवूडचे झाडून सर्व कलाकार याच परिसरात राहतात. त्यामुळे हा अमेरिकेतील सर्वात महागडा परिसर आहे. इथल्या घराच्या किंमती सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरच्या आहेत.
दक्षिण कॅलिफोर्नियातील लॉस एंजिल्स शहर देशातील फिल्म आणि टेलिव्हिजनच्या उद्योगाचं प्रमुख केंद्र आहे. याच परिसरात जगातील सर्वात मोठी आग लागल्याने आतापर्यंत 16 लोकांचा त्यात मृत्यू झाला आहे. पण अमेरिकेचे वृत्तपत्र आणि स्थानिक वेबसाईटनुसार मृत्यूचा आकडा हा फक्त सुरुवातीचा आकडा आहे. या आगीमुळे तब्बल दोन लाख लोकांना घर सोडून दुसरीकडे जावं लागलं आहे. तसेच दीड लाख लोकांना कोणत्याही क्षणी घर सोडून जाण्याच्या तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या डोळ्यांसमोर घर जळताना पाहून अनेकांच्या जीवाचं पाणीपाणी झालं आहे. अनेक सेलिब्रिटींनी तर सोशल मीडियावरून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
सर्व काही संपलं
अमेरिका आणि तमाम एजन्सींच्या आकडेवारीनुसार, लॉस एंजिल्समध्ये लागलेली आग अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण आणि खतरनाक आग आहे. आगीमुळे आतापर्यंत 135 बिलियन डॉलर ते 150 बिलियन डॉलरचं (11 ते सुमारे 13 लाख कोटी)चं नुकसान झालं आहे. एवढ्या कोटीची संपत्ती या आगीत भस्मसात झाली आहे. तर, यातील फक्त 8 बिलियन डॉलरची संपत्तीच विम्याच्या अंतर्गत येणारी आहे.
उत्तर प्रदेश -बिहारच्या बजेट एवढं नुकसान
या आगीत प्रचंड नुकसान झालं आहे. अब्जावधीची संपत्ती जळून खाक झाली आहे. या संपत्तीची तुलना केली तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आणि दिल्लीच्या बजेट एवढ्या संपत्तीचं नुकसान या आगीत झालं आहे. म्हणजे भारतातील चार राज्यांचं मिळून जेवढं बजेट आहे, तेवढ्या संपत्तीचं या आगीत नुकसान झालं आहे.
उत्तर प्रदेशचं बजेट 7 लाख कोटी आहे. बिहारचं एकूण बजेट 3 लाख कोटी आहे. तर मध्य प्रदेशचं बजेट एकूण 3 लाख कोटी आहे. तसेच दिल्लीचं 2024मधील बजेट 76 हजार कोटी रुपये होतं. या चार राज्यातील बजेटची बेरीज केल्यावर जेवढा आकडा येतो, तेवढं नुकसान या आगीत झालं आहे.