Published on
:
25 Nov 2024, 11:40 pm
Updated on
:
25 Nov 2024, 11:40 pm
कोल्हापूर : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत असून ऊस दर ठरविण्यासाठी पंधरा दिवसांत साखर कारखानदार व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची तातडीने संयुक्त बैठक बोलवावी, असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमनार यांना दिले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये गेल्या 2023-2024 च्या गळीत हंगामातील 200 रुपये अंतिम हप्ता व चालू 2024-25 च्या गळीत हंगामात पहिल्या उचलेची प्रतिटन 3700 रुपयांची मागणी केली होती. चालू वर्षीचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू येणार होता, परंतु अनेक साखर कारखानदार विधानसभा निवडणूक लढविण्यात गुंतल्याने नोव्हेंबरअखेर गाळप सुरू होण्याची शक्यता आहे. महापूर व लांबलेला गळीत हंगाम यामुळे शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. कडक उन्हाळ्यामुळे तोडणी मजुराकडून व ऊस तोडणी मशिन मालकाकडून शेतकर्यांची पिळवणूक केली जात असून एकरी 5 ते 10 हजार रुपयांची मागणी केली जाते. ही पिळवणूक थांबवावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 10.80 रिकव्हरी असणार्या कारखान्याने 3500 रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. 12 ते 12.30 टक्के रिकव्हरी असणार्या साखर कारखान्यांना तोडणी वाहतूक वजा जाता 3700 रुपये पहिली उचल जाहीर करण्यास काही अडचण नाही. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक बोलवावी. येत्या 15 दिवसांत ऊस दराबाबत काही निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन करावे लागेल. आंदोलनाने झालेल्या नुकसानीस संघटना जबाबदार असणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.