Published on
:
06 Feb 2025, 12:36 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:36 am
लंडन : वैज्ञानिकांनी आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच ‘एआय’चा वापर करून यापूर्वी कधी न पाहिलेल्या नॅनोमटेरियल्सपासून कार्बन स्टीलइतका मजबूत व स्टायरोफोमइतका हलका पदार्थ बनवला आहे. मशिन लर्निंग आणि थ्रीडी प्रिंटरचा वापर करून हे नवे नॅनोमटेरियल विकसित करण्यात आले. सध्याच्या अशा पदार्थांपेक्षा दुपटीने अधिक मजबूत आहे. विमान आणि मोटारींमध्ये अशा वजनाने हलक्या; पण अतिशय मजबूत पदार्थाचा भविष्यात वापर होऊ शकेल.
‘अॅडव्हान्स्ड मटेरियल्स’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. कॅनडाच्या टोरांटो विद्यापीठातील अभियांत्रिकीचे प्राध्यापक टॉबिन फिलेटर यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले. त्यांनी सांगितले, हे संशोधन भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. भविष्यातील विमान, हेलिकॉप्टर किंवा अंतराळयानांसाठी अल्ट्रा-लाईट वेट म्हणजेच अतिशय कमी वजन असलेले घटक तयार करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरेल. वजन कमी असल्याने अशा वाहनांची इंधनाची मागणी कमी होईल. तसेच त्यांची सुरक्षा वाढेल आणि देखभालीसाठीचा खर्चही कमी होईल. अशा मजबूत, पण वजनाने हलक्या पदार्थांपासून बनवलेली ही एरोस्पेस अॅप्लिकेशन्स आपली कामगिरीही चांगल्या प्रकारे करून दाखवू शकतील. या वाहनांपासून होणारे प्रदूषणही घटेल.