Published on
:
01 Feb 2025, 12:36 am
Updated on
:
01 Feb 2025, 12:36 am
लांजा : भरधाव कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास कुवे खत कारखाना येथे घडली. शिवाजी रामा भेरे (वय 54, रा. आरगाव कुणनेगाव, ता. लांजा) असे या अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे.
या अपघाताबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील कुणनेगाव येथील शिवाजी भेरे हे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच 08 एएम 2676) घेऊन लांजाकडे येत होते. शिवाजी भेरे यांची आरगाव कुणनेगाव येथे पीठाची चक्की असून, सामान आणण्यासाठी ते रत्नागिरी येथे निघाले होते. लांजा येथे दुचाकी ठेऊन ते एस. टी. बसने रत्नागिरी येथे जाणार होते. मात्र, प्रवासादरम्यान अर्ध्या रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. भेरे यांची दुचाकी लांजाच्या दिशेने निघाली होती. दुचाकी मुंबई-गोवा महामार्गावर कुवे खत कारखाना येथे आली असता, मुंबईकडे जाणार्या आयशर कंटेनरने (क्र. एम. एच. 04 के. एफ. 7116) दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. अपघातग्रस्त कंटेनर अब्दुल मोईद खान (32 वर्षे, रा. ठुकरापूर, जि. बलरामपूर, उत्तरप्रदेश) हा चालवित होता. दुचाकीला धडक बसल्याने शिवाजी भेरे हे महामार्गावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, पोलिस हेड. कॉन्स्टेबल सचिन भुजबळराव, वाहतूक पोलीस रहीम मुजावर या आपल्या सहकार्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची पोलिस ठाण्यात नोंद केली.
अपघात झालेल्या ठिकाणावरून कंटेनर चालकाने वाहनासह पलायन केले. त्या नंतर लांजा पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली होती. कंटेनरचा शोध घेत असताना कंटेनर लांजातील एका धाब्याजवळ आढळून आल्याने लांजा पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.