Published on
:
08 Feb 2025, 12:12 am
Updated on
:
08 Feb 2025, 12:12 am
मराठवाडा ही संतांची भूमी आहे, हा मुद्दा सर्वार्थाने सिद्ध झालेला आहे. तुमच्या- आमच्यासारख्या सामान्य माणसांना ‘संसार शिकविणे’ यासाठी केवळ संत मंडळीच कार्यरत असतात, असे नाही, तर अनेक ‘गुरू’ आपल्याला दैनंदिन आयुष्यात भेटत असतात आणि त्यांच्या पद्धतीने ‘धडे’ देत असतात. आयुष्यात कोण कोणता धडा कधी शिकवेल, याचा नेम नाही. औरंगाबादहून पुण्याला जायचे होते. दुपारची वेळ होती. सुखाला लालचावलेला देह लाल डब्यापेक्षा बसस्थानकाबाहेरून खुणावणार्या लक्झरी गाड्यांकडे ओढ घेत होता. झटपट आणि सुखाचा प्रवास, थांबे नाहीत की कान पिकविणारा दारे -खिडक्यांचा खडखड आवाज नाही. बाहेर पडलो तो एक लक्झरी सज्जच होती. पाच-सात लोक बसलेले होते. बाहेरचा पोर्या ‘पुणे...पुणे’ ओरडत होता. ड्रायव्हर महोदय स्थानापन्न झालेले होते. मुख्य म्हणजे गाडीच्या इंजिनाचा आवाज ती लगेच निघणार, हे सुचवित होता.
मी लगबगीने बाजूच्या हाफिसात जाऊन तिकीट काढून घेतले. गाडीत चढताना त्यांनी त्यातले अर्धे फाडून घेऊन अर्धे मला परत दिले. खिडकीच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसलो. अहाहा, काय ते सुख! उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी ऐटीत गॉगल डोळ्यावर चढविला आणि बाजूने जाणार्या लाल डब्यांकडे तुच्छ नजर टाकीत वाहतुकीचा आनंद घेत राहिलो. अर्धा-पाऊण तास झाला. गाडी हलायचे नाव घेईना. ड्रायव्हर महोदय स्थानापन्न होते आणि अधूनमधून गाडीच्या इंजिनाचा आवाज कमी-जास्त करीत होते. बराच वेळ वाट पाहून माझ्या सोबतचे एक चुलबुल पांडे ओरडले, ‘अरे गाडी काढता का मुक्काम करायचाय इथे?’ मीही आवंढा गिळत थोडेफार डायलॉग मारले. कुणीही काहीही प्रतिसाद दिला नाही. एव्हानापर्यंत गाडीत तीसेक लोकांची भरती झालेली होती आणि पंधराच्या आसपास सीटा ‘खाली’ होत्या आणि त्या भरण्यासाठी क्लिनर महोदय बसस्थानकाभोवती फिरत होते.
असंतोष खूप वाढल्यानंतर ड्रायव्हर महोदयांनी पब्लिककडे एक कटाक्ष टाकला आणि एकदाचा गियर टाकून गाडी सुरू केली. हुश्श करीत आम्ही प्रवासी पण निवांत टेकून बसलो. गाडी निघाली आणि चौकात वळसा घालून परत औरंगाबाद शहराकडे वळाली. परत मिल कॉर्नरला वळसा घालून अवघ्या पाचच मिनिटात पुन्हा पहिल्याच जागेवर येऊन उभी राहिली. परत अर्धा तास त्याच रंगमंचावर पहिलेच नाटक झाले. सगळेच वैतागले होते.
खासगी ट्रॅव्हल्स आणि इतर वाहनांचे चालक आणि सोबतचा पोर्यासुद्धा बर्याचवेळा उर्मट असतात. त्या तुलनेमध्ये एसटीचे वाहक आणि चालक नम्र असतात हे आपण नेहमीच पाहत असतो. सर्वसामान्यांचे दळणवळणाचे साधन म्हणजे आपली एसटी बस होय. जिथे जिथे एसटीची सेवा चांगली आहे, त्या प्रत्येक ठिकाणी एसटी बसने अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घातलेला आहे. वाजवी दर, चांगली सेवा आणि विनम्र कर्मचारी ही आता एसटीची ओळख झालेली आहे. ग्रामीण भागात तरी एसटीला पर्याय नाही, अशी परिस्थिती आहे. वेग मर्यादा ओलांडून बेदरकारपणे चालणार्या ट्रॅव्हल्सपेक्षा आपली जीवाभावाची एसटी कधीही चांगली.