सांगली ः शेरीनाला कृष्णा नदीत सुमारे 35 ते 40 वर्षे मिसळत आहे. (छाया ः सचिन सुतार)
Published on
:
04 Feb 2025, 12:40 am
सांगली : सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याला सात-आठ दिवसांपासून दुर्गंधी येत आहे. नदीकाठचे नागरिक या दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. आयर्विन पुलावरून ये-जा करणार्या प्रवाशांनाही नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सायंकाळनंतर तर ही दुर्गंधी तीव्रतेने जाणवते.
सांगलीत कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा विषय अधिक गंभीर बनत आहे. सांगली बंधार्यामुळे नदीपात्रातील पाणी थांबून आहे. पाणी वाहते नाही. पाणी थांबून असल्याने त्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. शिवाय शेरीनाल्याचे सांडपाणीही वर्षानुवर्षे नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. मात्र त्याकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष नाही.
शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळू नये म्हणून जुनी शेरीनाला योजना आणि धुळगाव योजना सुरू आहे. या दोन्ही योजनांकडील तीनशे अश्वशक्तीचे चार विद्युत उपसापंप सुरू आहेत. मात्र सकाळी 8 ते 12 या वेळेत सांडपाण्याचा प्रवाह अधिक असतो. त्यामुळे शेरीनाल्यावरील चारही पंप सुरू असले तरीही काही प्रमाणात सांडपाणी शेरीनाल्यावरून नदीत मिसळते.
शेरीनाल्याच्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी महापालिकेने 93.35 कोटी रुपयांचा प्रस्ताव केला आहे. हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी चार-पाच महिने मंत्रालयात पडून आहे. या योजनेला केव्हा मान्यता मिळणार आणि केव्हा काम सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार, खासदार आणि महापालिका प्रशासनाने शेरीनाला योजनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळ
‘सांगलीचे पाणी पचवू शकला, तो जगातील कोणत्याही ठिकाणचे पाणी पचवू शकतो,’ अशी म्हणच तयार झालेली आहे. 35 ते 40 वर्षे हा शेरीनाला सांगलीकरांच्या बोकांडी बसलेला आहे. अनेकजण आमदार, खासदार झाले; पण शेरीनाल्यापासून सांगलीकरांची मुक्तता कोणीही केली नाही. सांगलीकरांच्या आरोग्याशी, जिवाशी खेळ सुरू आहे. त्याचे राजकीय नेतृत्वाला काही देणे-घेणे नाही. कृष्णेसह अनेक नद्यांची माणसांनी गटारगंगा केलेली आहे, आता दुर्गंधीही पसरलेली आहे.