Published on
:
18 Jan 2025, 12:48 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:48 am
मडगाव : शेतीच्या रक्षणासाठी कुंपण घातले जाते, परंतु हेच कुंपण शेत खात असेल तर त्याला काय म्हणावे, असा प्रश्न आता पालिकांचा आर्थिक कारभार पाहून निर्माण झाला आहे. कारकुनाने केलेल्या साडेसतरा लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यामुळे मडगाव नगरपालिका प्रसिद्धीच्या झोतात असताना आता केपे नगरपालिकेतील लाखो रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याने सर्वांची झोप उडवली आहे. भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात दहा लाख रुपयांची अफरातफर झाली असून नुकत्याच झालेल्या ऑडिट दरम्यान हा प्रकार समोर आल्याने नगरपालिकेच्या कॅशियरला ते दहा लाख रुपये व्याजासकट भरण्याचे आदेश ऑडिटर कडून देण्यात आले आहेत.
या प्रकाराची बाहेर वाच्यता होऊ नये यासाठी बरीच गुप्तता पाळली जात होती. पण ‘कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही’ या म्हणीप्रमाणे अफरातफरीचा हा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून दहा लाख रुपये काढल्याचे ऑडिट दरम्यान उघड होऊनसुद्धा अद्याप केपे नगरपालिकेने त्या महिला कॅशियर विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. तिने दहा लाख रुपये भरण्यासाठी तयारी दर्शवली असली तरीही तिला वाचवण्यासाठी राजकीय स्तरावरून जोरदार प्रयत्न सुरू झाल्याचे समजते. असाच प्रकार मडगाव नगरपालिकेतही घडला होता. तीच गत केपे नगरपालिकेची होऊ नये यासाठी आताच कारवाई केली जावी अशी मागणी पालिका क्षेत्रातील जनतेने केली आहे.
सविस्तर माहितीनुसार, नगरपालिकेतील सर्व कर्मचार्यांच्या पगारातून कापली जाणारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम पालिकेच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर जमा होते. निवृत्त होणार्या कर्मचार्यांना त्या खात्यातील रकमेतून त्यांचा पीएफ देण्याचा नियम आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी केपे नगरपालिकेत कॅशियर म्हणून काम करणार्या एका महिला अधिकार्याने आपल्या गरजेप्रमाणे काही रक्कम सर्व सोपस्कार पूर्ण करून काढली होती. ती रक्कम काढल्यानंतर पीएफच्या खात्यात तिचे जवळपास सहा लाख रुपये शिल्लक राहिले होते. मात्र तिला पुन्हा पैशांची गरज भासल्यामुळे तिने त्या खात्यावरून तब्बल दहा लाख रुपये काढले. या प्रकाराची कोणालाही कानोकान खबर नव्हती. मात्र ऑडिट दरम्यान पालिकेचा आर्थिक व्यवहार तपासताना ऑडिटरला दहा लाख रुपयांचा फरक जाणवला. अधिक चौकशी केली असता कॅशियरने तिच्या सहा लाख रुपयांच्या रकमे ऐवजी जवळपास सुमारे दहा लाख रुपये काढल्याचा प्रकार समोर आला. आपला अहवाल सादर करताना ऑडिटरनी हा घोटाळा सर्वांच्या नजरेत आणला आणि व्याजासकट ती सर्व रक्कम पालिकेला परत करावी असे आदेश तिला दिले आहेत.
दरम्यान, याविषयी केपे नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मीकांत देसाई यांना विचारले असता, ऑडिट दरम्यान दहा लाख रुपये काढल्याचा प्रकार समोर आला असला तरीही ती चूक पालिकेच्या वरिष्ठ कारकुनाकडून झाल्याचे त्यांनी सांगितले. भविष्य निर्वाह खात्यातून त्या कॅशियरने जी रक्कम काही वर्षा अगोदर काढली होती, त्या रकमेचे ट्रांजेक्शन कारकुनाने नोंद करून ठेवलेच नाही. त्यामुळे सिस्टमवर महिलेच्या खात्यावर ते चार लाख रुपये आणि उर्वरित सहा लाख रुपये मिळून सुमारे दहा लाख रुपये शिल्लक आहेत असे दिसून आले. ते आपले असावेत असा विचार करून तिने ते काढले. पालिकेच्या ऑडिट दरम्यान दहा लाख रुपयांचा फरक जाणून आला. त्या कारकुनाने चार लाख रुपयांच्या व्यवहाराची नोंद केली असती तर आज हा प्रकार घडला नसता असे ते म्हणाले. तिला दहा लाख रुपये व्याजासकट भरण्याचे आदेश ऑडिटरकडून देण्यात आले असले तरीही एकूण विषय काय आहे हे त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले आहे. त्याविषयी सोमवारी पत्रव्यवहार आणि इतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले जातील. ती अधिकारी पैसे भरण्यास तयार आहे पण चार लाख ऐवजी दहा लाख तिला भरावे लागल्यास हा तिच्यावर अन्याय होईल असे ते म्हणाले.
भविष्य निर्वाह निधीवर परिणाम होण्याची नागरिकांना भिती
2024 वर्षाचा शेवट महिला सूत्रधार असलेल्या आर्थिक घोटाळ्यांच्या प्रकरणांनी झाला होता. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच समोर आलेले दहा लाख रुपयांच्या घोटाळ्यात देखील महिलेचाच समावेश आहे. ती महिला कॅशियर निवृत्तीच्या उंबरठ्यावर असून पुढच्या वर्षी तिची सेवा संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी तिच्या पगारातून पैसे वसूल केले जावेत अशी सूचना तिला दिल्याचे कळते. ते पैसे तिने परत न केल्यास इतर कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर त्याचा परिणाम होईल अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे