Published on
:
07 Feb 2025, 12:50 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:50 am
कोल्हापूर ः मोका कायद्याअंतर्गत कारवाई झालेला आणि सहा वर्षांपासून फरारी मटका बुकी सम—ाट सुभाष कोराणे (वय 41, रा. शिवाजी पेठ) याचा जेलमधून ताबा घेण्यासाठी तपास अधिकारी तथा शहर पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांनी विशेष मोका न्यायालयात गुरुवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी शक्य आहे.
न्यायालयाचा आदेश झाल्यास पोलिस त्याला तत्काळ ताब्यात घेतील, असे सांगण्यात आले. मुंबईतील कुख्यात मटका किंग सावला टोळीसह कोल्हापूरचा मटका बुकिंग सम—ाट कोराणे याच्यासह 44 जणांवर तत्कालीन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख आणि तत्कालीन पोलिस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी ‘मोका’अंतर्गत कारवाई केली होती. यापैकी 42 जणांना यापूर्वी अटक झाली होती. कोराणेसह दोघे फरार होते. अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर सम—ाट सहा वर्षांपासून फरार होता. बुधवारी दुपारी तो जिल्हा न्यायालयात स्वतःहून हजर झाला. न्यायालयाने त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली आहे. फरार काळात कोराणे कोठे आणि कोणाकडे वास्तव्याला होता, याचीही पोलिस माहिती घेत आहेत. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याप्रकरणी चौकशीत दोषी आढळून येणार्यांवर कठोर कारवाईचे आदेशही दिले आहेत. कोराणेच्या संपर्कात असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.